उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा विचारार्थ

नितीन गडकरी । जिल्ह्यातील पाच महामार्गांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा विचारार्थ

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर (Ahmednagar) शहरातील उड्डाणपुलाच्या (Flyover) दुसऱ्या टप्प्याबाबत विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी दिले आहे. अधिकाऱ्यांकडून हा विषय समजून घेवून त्याबाबत निधीची उपलब्ध झाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. औरंगाबाद ते पुणे प्रवास सोईस्कर आणि वाहतूक कोंडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ४ हजार ७५ कोटींच्या महामार्गाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित शनिवारी झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, आ. रोहित पवार, आ. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, आ. नीलेश लंके, आ. संग्राम जगताप, अंकूश काकडे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, राम शिंदे, आ. किरण लहामटे भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात गडकरी यांनी पेट्रोलला पर्याय असणाऱ्या इथेनॉल उत्पादन, साखर उद्योगासमोरील अडचणी आणि दुध उत्पादन वाढविण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या गिर गायींबाबत सुरू असलेल्या संशोधनाबाबत सविस्तार विवेचन केले. त्याच सोबत नगर जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. ही कामे सुरळीत व्हावी, अडलेली भूसंपादन कामे मार्गी लागावीत, यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतः बैठक घ्यावी, अशी गडकरींनी केली. तसेच, उड्डाणपूलाच्या कामासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी खूप पाठपुरावा केला. आज ते नाहीत याचं दुःख आहे, असेही गडकरींनी म्हटलं आहे. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ, खा. विखे, खा. लोखंडे यांचे भाषण झाले.

थोरातांना विनंती करणार

महाराष्ट्रात भूसंपादन दर वाढवला त्यामुळं भूसंपादन करण्यात अडचण येत आहे. तो कमी करावा, अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना करणार आहे. पुढाऱ्यांनी जागा घेण्याऐवजी सरकारने जागा घेऊन तेथे विकास करावा. आम्ही रस्ते देऊ, असं अश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलं आहे.

मला बरेच आमदार रस्त्यांच्या कामाची यादी देतात. नगरमध्ये देखील अशी यादी देण्यात आली आहे. यामुळे मला प्रश्न पडतो की मी राज्याचा बांधकाम मंत्री झालो की काय. तुम्ही मला पाच- पाच किलोमीटरच्या सीआरएफची लिस्ट देणार तर मी कसं काम करणार, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

पवारांकडून गडकरींचे कौतूक

कार्यक्रमात शरद पवारांनी गडकरी यांच्या कामाचे आणि दूरदृष्टीचे तोंडभरून कौतुक केलं. तसंच, आपण रस्ते मार्गानं जास्तीत जास्त प्रवास का करतो याचं कारणही पवारांनी यावेळी सांगितले. रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात. गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, अशा शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं. रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे मी शक्यतो रस्त्यानं प्रवास करतो, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

Related Stories

No stories found.