हिवरेबाजारचा कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण

पद्मश्री पवार : महिनाभरापासून करोनाला रोखले
हिवरेबाजारचा कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण

अहमदनगर (तालुका प्रतिनिधी) - आदर्श गाव हिवरे बाजार (ता.जि.नगर) येथे कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा नुकताच यशस्वीपणे पार पडला. यात एकूण 70 व्यक्तींना लस देण्यात आली. दरम्यान, योग्य नियोजन आणि गावकर्‍यांची साथ यामुळे महिनाभरापासून गावात करोनाचा शिरकाव होवून दिला नसल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

हिवरे बाजार येथील करोनाच्या विविध पथकात काम करण्यार्‍या स्वयंसेवकांना प्राधान्यांने लसीकरण करण्यात आले. त्यात कुटुंब सर्वेक्षण पथकातील स्वयंसेवक, रुग्णांना विविध तपासणीसाठी हॉस्पिटलपर्यत नेणारे व परत घरी पोहच करणारे वाहनचालक, विलगीकरण कक्षात काम करणारे स्वयसेवक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कुटुंबप्रमुख (विविध कामानिमित्त बाहेर पडणारे), दुध घेऊन नगरला जाणारे शेतकरी तसेच 45 पेक्षा जास्त असणारे वय ज्येष्ठ नागरिक, जुनाट आजार आहेत, त्याचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त प्रत्यक्ष नोंद्णीसाठी 110 व्यक्ती जास्त आल्या होत्या. त्याची नावे नोंदणी करून त्यांना पुढील लसीकरणाच्या वेळेस प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी चार पथके तयार केली होती लसीकरणासाठी गावातील स्वयंसेवक व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.

गावात येथील एकूण 205 व्यक्तींची करोना तपासणी केली असून त्यात एकही व्यक्ती करोना बाधीत आढळून आली नाही. गेल्या महिनाभर हिवरे बाजारामध्ये करोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपयायोजनाचे फलित असल्याचे पद्मश्री पवार यांनी सांगितले. तसेच विविध पथकात काम करणार्‍या स्वयंसेवकाना लसीकरण करण्यात आल्यामुळे ते आता सुरक्षित झाले असून पुढील काम करण्यासठी त्यांचा उत्साह वाढला आहे. यात करोना होऊन गेलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आले नाही, तसेच दुसर्‍या डोससाठी शासकीय नियमानुसार 84 दिवस पूर्ण झालेले नसल्यामुळे त्यांना वगळण्यात आले.

लस मर्यादित असल्यामुळे एका कुटुंबातील जर 4 व्यक्ती एकाच वेळेस आल्या तर त्याच कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. जे गावात राहतात त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे लसीकरण करताना कुठलीही अडचण आली नाही. लसीकरणाच्या पुढच्या टप्यात खरीपाची तयारी करणारे जे शेतकरी खते व बियाणे खरेदीसाठी बाजारात जाणार आहेत यांचा समावेश असणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com