रस्ता बनला पाण्याचं तळं

प्रश्नाकडे दर्लक्ष करून लाखोचा खर्च वाया : नागरिकांत संताप
रस्ता बनला पाण्याचं तळं

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

येथील मिल्लतनगर मधील मुख्य रस्त्याचे रूपांतर सध्या पाण्याच्या मोठ्या तळ्यामध्ये झालेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या भागातील रस्त्यावर प्रचंड पाणी साचले असून या पाण्यामुळे नुकताच बनवलेला हा रस्ता देखील आता खराब होणार आहे.

मिल्लतनगरमधून पुढे संजयनगरकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठी वाहतूक सतत असते. गोंधवणी पुलापासून मिल्लतनगर पुलापर्यंतचे रस्त्याचे काम नगरपालिकेने दोन महिन्यापूर्वीच केले आहे. तर मिल्लतनगर पुलापासून गोपिनाथनगर मधील साई भुयारी मार्ग पर्यंतच्या रस्त्याचे काम आ. लहू कानडे यांच्या निधीतून झालेले आहे. मात्र सदरचे काम करताना वरच्या भागातील रस्ता उंच झाला आहे तर खालच्या भागातील रस्ता खालीच राहिला. त्यामुळे उंच सखल भाग झाल्याने पावसाचे पाणी या भागांमध्ये जमा होत आहे.

रस्त्याच्या कडेला गटारीची सुविधा नसल्यामुळे सदरचे पाणी वाहून जाण्यास कोणतीही जागा नाही. त्यामुळे गेले आठ ते दहा दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे येथे दररोज मोठे तळे निर्माण झाले आहे. संजयनगर, गोपीनाथनगर, रामनगर इत्यादी भागातून नागरिक, महिला आपल्या दुचाकी-चारचाकीतून याच रस्त्याने शहरांमध्ये येत असतात. या साचलेल्या पाण्यामुळे सर्व जनतेला विशेष करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याचे काम करताना नगरपालिकेचे बांधकाम खात्याचे अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी या भागातील उंच-सखलपणा नाहीसा करून समतल रस्ता करणे आवश्यक होते. रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची सुविधा असणे गरजेचे असताना या भागात अशी कोणतीही सुविधा निर्माण झालेली नाही. कॅनालला पाणी आल्यानंतर पाझरामुळे कॅनॉलचे सर्व पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे गोंधवणी पुलापासून गोपीनाथनगर पर्यंतचा पूर्ण रस्ता वारंवार खराब होतो. यापूर्वी देखील कॅनॉलच्या कडेने ड्रेनेज करण्याची मागणी नागरिकांनी वेळोवेळी केलेली असताना जाणीवपूर्वक त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरचा लाखो रुपयांचा खर्च वाया घालविण्याचे पाप नगरपालिका व ठेकेदार करत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com