
अहमदनगर (प्रतिनिधी)
दोन वर्षापासून चातकाप्रमाणे बदलीसाठी वाट पाहणार्या आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची बदलीची प्रक्रिया आज (दि.6) पासून सुरू होणार आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधीत शिक्षकांना 9 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून त्यानंतर 10 ते 12 ऑगस्टदरम्यान प्रत्यक्षात बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी 478 जागा रिक्त असून याठिकाणी संबंधीत शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे.
दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पुढील शनिवार (दि.13) संपणार असून त्यानंतर 16 ऑगस्टपासून जिल्हातंर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया होणार आहे. दोन वर्षापासून कोविडमुळे नगरसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया झालेली नव्हती. यामुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा बदलीसाठी खास सॉफ्टवेअर तयार केले होते. मात्र, सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर ते कार्यन्वित करतांना अनेक वेळा अडचणी आल्या. त्या अडचणी सोडवून बदल्यासाठी सॉफ्टवेअरची अनेक वेळा रंगित तालीम घेवून संबंधीत सॉफ्टवेअर शिक्षकांच्या बदल्यासाठी सज्ज झाले आहे.
मागील आठवड्यात आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यात आधी रोष्ट्रर पाहणी यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाच्या किती जागा रिक्त आहेत, यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर आजपासून आंतरजिल्हा शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यसाठी 9 तारखेपर्यंत तीन दिवसांची मुदत असून त्यानंतर 10 ते 12 ऑगस्टदरम्यान प्रत्यक्षात आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. 13 तारखेला बदली होणार्या शिक्षकांना ऑर्डर देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून कळविण्यात आले आहे. आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया झाल्यानंतर 16 तारखेपासून जिल्हातंर्गत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अशी आहेत रिक्तपदे
एसी 70, एसटी 154, एसटी (पेसा) 28, व्हीजेएनटी शुन्य, एनटीसी उणे 165 (अतिरिक्त), एनटीडी उणे 53 (अतिरिक्त), एसबीसी उणे 13 (अतिरिक्त), ओबीसी 50, ईडब्यूएस 45 आणि ओपन 131 अशी 478 पदे आंतरजिल्हा बदलीसाठी रिक्त आहेत.