नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील सौंदाळा येथील २२० केव्ही वीज उपकेंद्राकडून थकीत कर रकमे पोटी वीज पारेषण कंपनीकडून...

सौंदाळा ग्रामपंचायतीस २८ लाख ९ हजार ४५६ रुपयांचा भरणा करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ.प्रियंका शरद आरगडे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने मालमत्ता कर वसुलीसाठी २२० केव्ही उपकेंद्र सौंदाळाच्या कर आकारणी बाबत महा पारेषण कंपनीच्या बाभळेश्वर अति उच्च दाब व सुरक्षा विभागचे कार्यकारी अभियंता यांना उपकेंद्राला गुरुवार दि.८ एप्रिल रोजी सील लावण्याची नोटीस बजावली होती.यात सन २०१९-२० या वर्षातील ५० टक्के रक्कम ९ लाख ३६ हजार ४८५ रुपये व सन २०२०-२१ या वर्षातील बाकी रक्कम १८ लाख ७२ हजार ९७१ रुपये कर थकीत असून सदर थकीत कर एकूण रक्कम २८ लाख ९ हजार ४५६ येणे बाकीची मागणी केली होती.

सदर थकीत कर रक्कम जमा न केल्यास गुरुवार दि.८ एप्रिल २०२१ सकाळी ११ वाजता मोहर बंद(सील) करण्याची नोटीस दिली होती. त्याची दखल कार्यकारी अभियंता अति उच्चदाब संवर्धन व सुधारणा विभाग, महापारेषण बाभळेश्वर यांनी दि. ८ एप्रिल रोजी तीन धनादेशाव्दारे २८ लाख ९ हजार ४५६ रुपये मालमत्ता करा पोटी सौंदाळा ग्रामपंचायतीला दिले आहेत.

धनादेशासोबत ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रात महा पारेषणने म्हंटले आहे की, उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या निकालाच्या आधीन राहून २२० केव्हि सौदाळा उपकेंद्रासाठी मागणी केलेल्या कराचा धनादेश आपणास अदा करण्यात येत आहे. तसेच आपल्या पत्रा सोबत आपण जिल्हा परिषद अहमदनगर यांचा निकाल संदर्भ पत्रासोबत जोडलेला आहे. सदर निकालाप्रमाणे आपणास गट वर्ष २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता आपण मागणी केल्याप्रमाणे करापोटी तूर्तास प्रमाणे धनादेश क्रमांक ५२१८२० रुपये १० लाख,धनादेश क्रमांक ५२१८२१ रुपये १० लाख व धनादेश क्रमांक ५२१८२२ रुपये ८ लाख ९ हजार ४५६ असे तीन धनादेश अदा करण्यात येत आहे. वरील धनादेश हे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलाच्या निर्णयास आधीन राहून अदा करण्यात येत आहे. त्यामुळे या बाबत उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचा अंतरिम किंवा अंतिम निकाल या धनादेश अदा करण्याच्या प्रकीयेस लागू राहील याची क्रुपया नोंद घ्यावी व जर सदर निकाल हा महापारेषणच्या बाजूने लागल्यास कृपया दिलेले धनादेश महापारेषण कंपनीस परत करावेत असे म्हंटले आहे.

महा पारेषणचे अभियंता राकेश कुमार राकेश कुमार यांनी ग्रामसेवक रेवन्नाथ भिसे यांचेकडे हे धनादेश सुपूर्द केले. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे, शरद आरगडे, उपसरपंच कानिफनाथ आरगडे, रामकिसन चामुटे, सचिन आरगडे, बबन आरगडे, बाळासाहेब बोधक, जगन्नाथ आढागळे, रेवननाथ आरगडे, मारुती आरगडे आदी उपस्थित होते. मिळालेल्या या कर रकमेतुन ग्रामविकास करणार असल्याचे सरपंच प्रियंका आरगडे यांनी सांगितले.

अंधाराचे संकट टळले...

महा पारेषण कंपनीने सौंदाळा ग्रामपंचातीला मालमत्ता कराची रक्कम अदा केल्याने सौंदाळा ग्रामपंचायतीने २२० केव्ही उपकेंद्राला दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा सील करण्याची नोटीस मागे घेण्यात आली. आता वीज उपकेंद्र सील होणार नसल्याने नगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्याचा तर बीड जिल्ह्यातील रायमोह आणि वाळुंज औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील वीज पुरवठा खंडित होण्याचे संकट टळले आहे