दोन हॉटेलचा मालक घेतोय दारिद्रयरेषेखालील शिधापत्रिकेचा लाभ

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या विरोधात भाजपा शहराध्यक्षांची तहसीलदारांकडे तक्रार
दोन हॉटेलचा मालक घेतोय दारिद्रयरेषेखालील शिधापत्रिकेचा लाभ

संगमनेर (शहर प्रतिनिधी) :-

दोन हॉटेलचा मालक असलेल्या संगमनेरातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेचा वापर विविध शासकीय लाभ मिळविण्यासाठी केला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून शिवसेनेच्या सदर पदाधिकाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या तक्रारीमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यात शिधापत्रिकेचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वापर सुरू आहे. पात्रता नसतानाही अनेक जणांनी खोटे कागदपत्र सादर करून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका काढल्या आहेत.

महसूल खात्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना हाताशी धरून असे काम सर्रासपणे होत असल्याचे आढळून येत आहे. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेचा वापर शहरातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानेही केला असून त्याच्या दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिकेचा नंबर २७२०१९११२१५३ असा आहे. सदर पदाधिकाऱ्याने दारिद्र्यरेषेखाली असल्याचे भासवून या शिधापत्रिकेचा लाभ घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांना या बोगस शिधापत्रिकेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत सर्व कागदपत्रे गोळा केली आहेत. ही शिधापत्रिका बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसीलदार अमोल निकम यांना दि. १२ जुलै २०२१ रोजी तक्रार अर्ज दिला आहे.

दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेचा गैरवापर लाभ करत विविध शासकीय घेणाऱ्या शिवसेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ॲड. गणपुले यांनी केली आहे.

याबाबत तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डचा लाभ घेतलेला आहे व सध्या ही घेत आहे. या शिधापत्रिकेचा लाभ घेताना २०२० सालात त्यांनी कारागृहातील कैद्यांना अन्नपुरवठा करण्यासाठीची निविदा भरलेली आहे. या निवेदनासोबत त्याने स्वतःचे पॅनकार्ड ची प्रत, स्वतःच्या नावावर असलेल्या हॉटेल रेस्टॉरंट आणि केटरर्स या दुकानाचा परवाना तसेच दि. २९ जून २०२० पर्यंत त्याच नावाने नोंदवलेले अन्न व औषध प्रशासनाचे नोंदणी प्रमाणपत्र, २०२० - २०२१, २०२९-२०२० या वर्षातील आयकर परतावा भरण्याच्या चलनाच्या प्रति, हॉटेलच्या नावाने जीएसटी नंबर मिळविण्याचे प्रमाणपत्रही जोडले आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या सहीने त्यास शिवभोजन केंद्र सुरू करून देण्यात आले आहे, याचेही पत्र जोडले आहे. नगरपालिका निवडणूक लढवताना दिलेल्या प्रमाणपत्रातही त्याने उत्पन्नाचे व मालमत्तेचे विवरण जोडलेले आहे, अशा परिस्थितीत सदर व्यक्तीचे उत्पन्न जास्त असल्याचे दिसून येत आहे. दारिद्र्यरेषेखाली नसतानाही त्याने पिवळे रेशनकार्ड मिळविले आहे. या शिधापत्रिकेच्या आधारे त्याने गेल्या सहा ते सात वर्षांपासून शासनाची फसवणूक करून दारिद्र्यरेषेखालील लाभ मिळविले आहे व सध्या मिळवत आहे.

या शिधापत्रिकेसाठी बनावट कागदपत्र करून त्याने लाभ मिळविला आहे. त्यामुळे भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे त्याने गुन्हा केलेला आहे. शासकीय यंत्रणेची फसवणूक केली असल्याने तहसीलदारांनी स्वतः फिर्यादी होऊन त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी अॅड. गणपुले यांनी केली आहे.

अॅड. गणपुले यांचा तक्रार अर्ज दाखल झाला आहे. सदर प्रकरणावर रितसर चौकशी सुरु आहे. चौकशी झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल.

अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने बोगस शिधापत्रिकेचा आधार घेत विविध शासकीय लाभ मिळविले आहेत व मिळवत आहे. सदर इसमाविरुद्ध शासनाकडे रितसर पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे. याची दखल घेऊन तहसीलदार अथवा पुरवठा निरीक्षक, संगमनेर यांनी सदर व्यक्तीविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा, जर आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तर आपण स्वतः सदर व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहोत.

- अॅड. श्रीराम गणपुले, भाजपा शहराध्यक्ष, संगमनेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com