शिर्डी (शहर प्रतिनिधी) -

करोनाच्या कालावधीत साडेसात लाख लोकांना त्यांच्या गावी सुखरूप पोहचविण्यासाठी मला मिळालेली सेवा ही ईश्वराची देणगी असल्याचे

सिने अभिनेता सोनू सूद याने सांगितले. दरम्यान कोपरगावशी वेगळे नातं असल्याने त्याने येथील मराठी शाळेतील शंभर मुलांना मोबाईल वाटप केले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता सोनू सुद यांनी शुक्रवार दि. 8 रोजी साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, विनोद राक्षे, आरिफ शेख आदी मान्यवरांसह असंख्य चाहते उपस्थित होते.

साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना सोनू सुद यांनी सांगितले की, करोनानंतर प्रथमच साईबाबांचे दर्शन घ्यायला या ठिकाणी आलो असून त्यामुळे मन आनंदी झाले आहे. जगभरात तसेच देशात जनजीवन पुन्हा पूर्ववत सुरळीतपणे सुरू व्हावे यासाठी साईबाबांना प्रार्थना केली असल्याचे सांगत बाबा सर्वांच्या दुःखाचे निवारण करेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील वर्षी मी साईंचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो त्यावेळी बाबांना प्रार्थना केली होती की मला जीवनाचा मार्ग दाखवा आणि त्यामुळे तो रस्ता मला साईंनी दाखवला असून आज समाजाची सेवा करण्याचा जो मार्ग बाबांनी मला दाखवला आहे त्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी म्हटले.

करोनाच्या काळात घरवापसी करणारे साडेसात लाख लोक माझ्या परिवाराचा हिस्सा असल्याचे ही त्यांनी सांगितले. माझ्याशी आजही दररोज नवनवे लोक जोडत असल्याने माझा परिवार मोठा होत आहे. त्यामुळे परिवार मोठा झाल्याने तेवढी शक्ती मला मिळावी अशी साईबाबांना प्रार्थना केली असून ही सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे. सर्वानी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला यावे त्यामुळे मन स्वच्छ होईल, असे त्यांनी आवाहन केले. दर्शनानंतर त्यांनी कोपरगाव येथील मराठी शाळेत शंभर मोबाईल वाटप केले. या शाळेत उर्दू, ख्रिश्चन तसेच मराठी मुले एकत्र शिक्षण घेतात.

अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रथम कोपरगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, मात्र नागपूर येथे सिलेक्शन झाल्याने आज तब्बल बावीस वर्षांनी कोपरगाव येथे येणे झाले. त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून कोपरगावशी एक वेगळं नातं तयार झाले आहे.

- सोनू सुद, सिने अभिनेता