करोना चाचण्या वाढवल्यानेच रुग्णांची संख्या वाढली
सार्वमत

करोना चाचण्या वाढवल्यानेच रुग्णांची संख्या वाढली

राहूल द्विवेदी : फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नगरकरांशी साधला संवाद

Nilesh Jadhav

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या चाचण्यांची संख्या वाढत असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. रुगणांपर्यंत पोहोचून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेवढे रुग्ण वाढत आहेत, तेवढे किंबहूना त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत.

नागरिकांनी या आजाराची लक्षणे जाणवल्यास जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी रविवारी फेसबुक लाईव्हव्दारे नगरकरांशी संवाद साधत त्यांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे देत निरसन केले. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. ही माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत जावी. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे एखाद्या यंत्रणेबद्दलची प्रतिमा तयार होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला.

यावेळी द्विवेदी म्हणाले, ज्या रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, मात्र ते बाधित आहेत, त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात न येता तालुका आणि मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले पाहिजे. जेणेकरुन गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा वापरता येईल. विविध रुग्णालयातील खाटांची उपलब्धता याबद्दलही अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी प्रश्न विचारले. त्याच अनुषंगाने उत्तर देताना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी येत्या 2-3 दिवसात पोर्टल तयार करुन जिल्ह्यातील तालुकानिहाय सर्व ह़स्पिटल्सची माहिती, उपलब्ध बेडसंख्या त्यामध्ये देणार असल्याचे स्पष्ट केले.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना अजूनही नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत, याबाद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. असे नागरिक इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचवत असल्याचे ते म्हणाले. आपण सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे या बाबी पाळल्या पाहिजेत. त्यामुळे होणारा प्रादुर्भाव बर्याच अंशी आपण कमी करु शकू.

जिल्ह्यात सुरुवातीला नागरिकांच्या घशातील स्त्राव चाचणी करण्यासाठी स्त्राव पुण्याला पाठवावे लागत होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु झाली. प्रतिदिन 300 चाचण्यांवरुन तेथील क्षमता आपण आता प्रतिदिन 1000 इतकी केली आहे. याशिवाय, रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या माध्यमातून आपण कन्टेन्मेंट क्षेत्रातील नागरिकांच्या चाचण्या करीत आहोत. खाजगी प्रयोगशाळांच्या माध्यमातूनही चाचण्या होत आहेत. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचून बाधित असणार्यावर उपचार करत आहोत, असे सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com