अकोले तालुक्यात 19 करोना बाधीत
सार्वमत

अकोले तालुक्यात 19 करोना बाधीत

रुग्ण संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर, चौथा बळी

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात काल शुक्रवारी 19 जण करोना बाधित आढळून आले आहेत.त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता 197 वर जाऊन पोहचली आहे. मोग्रस येथील 45 वर्षीय व्यक्तीचा नाशिक येथे उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यांच्या रूपाने तालुक्यातील करोनाचा हा चौथा बळी ठरला आहे.

काल शहरालगत असणार्‍या खानापूर येथील कोव्हीड सेंटर येथे 64 व्यक्तीच्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यात तालुक्यातील 19 व्यक्ती पॅाझिटीव्ह आढळून आले. यामध्ये लिंगदेव येथील 65 व 60 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला 12 वर्षिय मुलगी तर इंदोरी फाट्याजवळील 70 वर्षीय, 47 वर्षीय 26 वर्षीय पुरुष व 22 व 20 वर्षीय महिला, निंब्रळ येथील 57 व 35 वर्षीय महिला 17 वर्षीय युवती, धामणगाव आवारी येथील 65 वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथील 60 वर्षीय पुरुष, 20 व 17 वर्षीय महिला तसेच शहरालगत परखतपुर रस्त्यावर राहणार्‍या 32 वर्षीय पुरुष 55 व 43 वर्षीय महिला असे एकुण 19 जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर काल रात्री उशिरा अहमदनगर येथे शहरातील एका नगरसेविकेच्या बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. मात्र सदर महिला ही संगमनेर येथील रहिवासी असल्याने तिचा मृत्यू हा संगमनेर मध्ये समाविष्ट होणार आहे तर नगरसेविकेच्या अकोले येथील घरी ती काही दिवस राहिल्याची माहिती असल्याने तो परिसर प्रशासनाने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे.

तालुक्यातील मोग्रस येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यांचेवर नाशिक येथे उपचार सुरू होते. काल शुक्रवारी त्यांचे उपचारादरम्यान नाशिक येथे निधन झाले. त्यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या चार वर पोहचली आहे.

सध्या अकोले तालुक्यातील 62 लोकांवर उपचार सुरू आहेत. 131 जणांवर उपचार करण्यात आले असून ते घरी परतले आहे.

इंदोरी सात जणांना पुन्हा करोनाची लागण

इंदोरी वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार तीन करोना बाधीतांच्या सहवासातील सात जणांना पुन्हा करोनाने आपल्या जाळ्यात ओढले. अवघ्या 24 तासात तीन बाधितांच्या संपर्कात आलेल्या सात जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने इंदोरी परिसरात खळबळ उडाली आहे.

इंदोरी गावातील 45 वर्षीय रुग्णाच्या सहवासातील दोन महिलांची रिपोर्ट काल रॅपिड टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आले. तसेच इंदोरी फाट्यावरील बाधित पती-पत्नीच्या कुटुंबातील पाच जणांना पुन्हा करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अवघ्या 24 तासांतच तीन रुग्णांची संख्या वाढून बाधित रुग्णांची संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे परिसरात करोनाने वेगाने गुणाकार सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. करोना नियंत्रण कमिटीतील दोन सदस्यही ही बाधितांच्या सहवासात आल्याने त्यांची ही धाकधूक वाढली आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी काल इंदोरी येथील कंटेनमेंट झोनची पाहणी करत करोना कमिटी व आरोग्य विभागाला सूचना केल्या. बाधित कुटुंबातील होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णाच्या घरातील एक जण घराबाहेर उभा असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या इसमाची रवानगी शाळेत करण्याचे आदेश दिले. दरम्यान इंदोरी गावात गुरुवारपासूनच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू सुरू झाला असून गाव संपूर्ण बंद असल्याने शुकशुकाट दिसत होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com