नेवासा तालुक्यातील करोनाबधितांची संख्या 393 वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील करोनाबधितांची संख्या 393 वर

नेवासा तालुक्यात दिवसभरात 21 संक्रमित

Nilesh Jadhav

नेवासा शहरात नव्याने 7 संक्रमित

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

बुधवारी नेवासा शहरात सहा रुग्ण आढळले असून दिवसभरात तालुक्यात एकूण 21 करोना बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यातील रुग्ण संख्या 393 वर गेली आहे.

नेवासा येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये मंगळवारी 45 व्यक्तींचे स्त्राव अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. बुधवारी सकाळी आलेल्या अहवालांत 13 व्यक्ती करोना बाधित आढळल्या असून त्यामध्ये नेवासा शहर सात, सोनई तीन, भानसहिवरा दोन व तरवडी येथील एकाचा समावेश आहे. 32 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सोनई येथील एक व उस्थळ येथील एकाचा खाजगी रुग्णालयातून अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बुधवारी कोव्हिड केअर सेंटर येथे 61 व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये सोनई येथील सहा व्यक्ती करोना बाधित आढळून आले तर 55 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. 16 व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने 284 करोनामुक्त झाले आहेत. तर शंभर व्यक्ती उपचार घेत आहेत.

नेवासा शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने शनिवार सायंकाळपासून नेवासा व नेवासा फाटा येथे जनता कर्फ्यू सुरू आहे. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असेच सहकार्य कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोनई परिसरातील वस्त्यांवर आढळले 10 संक्रमित

सोनई |वार्ताहर|Sonai

सोनईजवळचे धनगरवाडी, बेल्हेकरवाडीमध्ये सापडलेल्या करोना संक्रमीत रुग्णांनंतर बुधवारी 12 ऑगस्ट रोजी गावपेठजवळच्या वस्त्यांवर 10 करोना संक्रमीत रुग्ण आढळून आले असून त्यामुळे सोनई परिसराची धाकधुक पुन्हा वाढली आहे.

याबाबत सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांच्याकडून समजलेली माहिती अशी की, अँटीजेन रॅपीड तपासणीत 3 व्यक्ती बाधित आल्या असून स्वॅब चाचणीत 3 तर खासगी तपासणीत 1 व मुळा कारखान्याचे 3 कर्मचारी करोना बाधित आढळले आहेत.

सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सोनई गावाजवळच्या वस्त्या, कॉलनीमधील माहिती संकलन करण्याचे काम चालू असून संक्रमीत रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या माहिती घेऊन त्यावर शासनाचे नियमाप्रमाणे पुढील उपचार करण्यात येत आहे.

गणेशवाडी रोड व आंबेडकर चौका जवळसुद्धा रुग्ण आढळल्याने करोना पुन्हा सोनईत शिरकाव करण्याची दाट शक्यता आहे. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या पूर्वीच करोना बाधित झाल्याने आता पूर्वीइतका पोलीस बंदोबस्त नाही तसेच पोलीस कारवायांचे प्रमाणही थंडावलेले दिसत आहे. मास्क न वापरल्याबद्दल 188 ची कारवाई परिसरात क्वचितच होताना दिसत आहे.

गर्दी वाढली, धोका वाढला...

सोनई परीसरात लॉकडाऊन संपून गेल्या काही दिवसांपासून व्यापारी पेठ, कापड, किराणा, भाजीपाला, सलून, हॉटेल्स सर्व काही खुले झाल्याने येथे आजुबाजूच्या ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत असून सोनईची करोना दक्षता कमिटी कुठेही कार्यरत दिसत नाही. त्यामुळे सोनईत गर्दी वाढून ग्रामस्थांना करोनाचा धोका वाढत आहे.

मोठे व्यापारीच ओरड करतात...

सोनई गाव व परिसरात रुग्ण संख्या व गर्दी वाढत असल्याने गाव पुन्हा सील करून लॉकडाऊन आवश्यक आहे. परंतु सोनईतील मोठमोठे व्यापारी दुकाने बंद ठेवण्यास आढेवेढे घेतात. तसेच बंदचा निर्णय घेतल्यास ओरड करतात. त्यांना करोनाचे काहीच गांभीर्य वाटत नसून फक्त दुकाने चालू ठेऊन पैसा मिळवणे हेच त्यांना आयुष्यापेक्षा जास्त वाटत असल्याचे मत एका ग्रामपंचायत सदस्याने खासगीत व्यक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com