अहमदनगर (प्रतिनिधी)

यावर्षी जगभर अतिवृष्टी झालेली पहायला मिळत असली तरी भविष्यकाळात पाणी टंचाई वाढत चाललेली आहे. त्यासाठी भूजलावर आधारित पाणी व पिक व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हिवरे बाजार भेटीत व्यक्त केले.

डॉ. कलशेट्टी म्हणाले, 1993 मध्ये यशदा पुणे येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना त्यांनी हिवरे बाजारला प्रथम भेट दिली होती.त्यानंतर उपसचिव पाणीपुरवठा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सांगली, राज्य समन्वयक स्वच्छता विभाग, जिल्हाधिकारी नंदुरबार, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका अशा विविध पदावर असताना 8 ते 10 वेळा हिवरे बाजारला भेट देण्याचा योग आला.प्रत्येक वेळेच्या भेटीत काहीतरी नाविन्यपूर्ण पहावयास मिळते हे हिवरे बाजारच्या सातत्याचे गमक आहे.

स्वच्छता व पाणी यातून समृद्धीकडे हा मंत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून यशस्वी केला. पडणार्या पावसावर आधारित उपलब्ध पाण्यानुसार पाण्याचा ताळेबंद व त्यानुसार पिकपद्धतीत केलेला बदल ज्यामुळे आज हिवरे बाजार युरोपियन देशांनाही लाजवेल अशी स्वच्छता, मुबलक पाणी,हिरवाईने नटलेला परिसर पहायला मिळतो. भविष्यकाळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता वरिष्ठ भूवैज्ञानिकांची लवकरच राज्यस्तरीय कार्यशाळा हिवरे बाजार येथे घेतली जाईल व त्यातून दीर्घकालीन भूजल व्यवस्थापनाचे नियोजन कसे करता येईल याबाबत लवकरच नियोजन करणार असल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले. यावेळी हनुमंत ढोकळे मुख्य अभियंता भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,काटकर वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अहमदनगर विभाग व इतर अधिकारी उपस्थित होते.