आयुर्वेदात नवीन संशोधनाची गरज

राज्यपाल कोश्यारी : आरोग्यासाठीचा मूळ पाया
आयुर्वेदात नवीन संशोधनाची गरज

लोणी | वार्ताहर

आयुर्वेद (Ayurveda) हा आरोग्यासाठीचा मूळ पाया आहे. त्याची जाण असणारे व अचूक निदान करणारे लोक आजही आहेत. मात्र आयुर्वेदात नवीन संशोधनास (research) पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह (Governor Bhagat Singh Koshyari) कोश्यारी यांनी केले.

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या प्रवरा आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय व डॉ.बाळासाहेब विखे पाटील रिसर्च सेंटरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पिम्स विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, विश्वस्त मोनिकाताई सावंत-इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले की, पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरेत शिक्षण व आरोग्य सेवेचा पाया रचला व विस्तारही केला. डॉ.राजेंद्र विखे हे काम अधिक पुढे घेऊन जात आहेत. आयुर्वेदाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आजही त्याचे जाणकार आहेत. केंद्र सरकारने आयुष मंत्रालय त्यासाठी सुरू केले आहे. पंतप्रधानांनी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि त्यास 180 देशातून प्रतिसाद मिळाला. स्वस्त जनऔषधी दुकाने सुरू केली. या माध्यमातून आयुर्वेदाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेत आयुर्वेद विद्यापीठं सुरू झाली आहेत. प्रवरेत आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र या कामी महत्वाचे योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पिम्स विद्यापीठ आणि आरोग्य सेवेची माहिती दिली.कुलगुरू डॉ.मगरे यांनी स्वागत केले तर खा.सुजय विखे यांनी आभार मानले. समारंभाला राजकीय, आरोग्य, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी राज्यपाल दोन दिवसीय नगर दौर्‍यासाठी लोणी येथील हेलीपॅडवर आगमन झाले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.व्ही.एन.मगरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस दलातर्फे राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यात आली.

दुपारी 4 वाजता राज्यपाल राहुरी कृषी विद्यापीठांना भेटी देणार आहेत. विद्यापीठात त्यांचा मुक्काम असून गुरूवारी सकाळी 10.30 वाजता पदवीप्रदान सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजून 20 मिनीटांनी हिवरेबाजार भेट तर 3.35 वाजता राळेगणसिद्धी येथे भेट देणार आहेत. सायंकाळी 4 वाजून 20 मिनीटांनी ते हॅलिकॉप्टरने मुंबईतील राजभवनाकडे रवाना होतील.

आयुषचे योगदान

चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रवरेने आपल्या कामातून देशात नावलौकिक मिळवला आहे. आयुर्वेदासाठी मोदी सरकार काम करीत आहे. वनस्पतींची लागवड केल्यास शेतकर्‍यांना त्याचा चांगला लाभ होईल. करोना महामारीत आयुष मंत्रालयाने महत्वाचे योगदान दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com