श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ऊर्जामंत्री व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात

फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्याच अनुषंगाने श्रीरामपूर येथील पदाधिकार्यांंनी देखील शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती. सर्व वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे, असे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीच्या सणाच्या वेळेस महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलामध्ये सवलत देऊन गोड बातमी देऊ, असे आश्वासन दिले होते.

त्यामुळे नागरिकांनी लाईट बिल भरले नाही; परंतु ज्यांनी मंत्री यांच्या शब्दावर विश्वास ठेवून लाईट बिल भरले नाही, अशा नागरिकांना भरमसाठ व्याज लावून पुन्हा जास्तीचे लाईट बिल पाठविण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी संबंधित मंत्र्यांनी व अधिकार्यांनी लाईट बिल सक्तीने वसूल करावे व जे लोक वीज बिल भरणार नाही अशांचा वीज पुरवठा कट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच उर्जा सचिव व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात संगनमत करून मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तुषार बोबडे, डॉ. संजय नवथर, सुरेश जगताप, उदय उदावंत, सुभाष सोनवणे, गणेश दिवस, राहुल दातीर, विशाल शिरसाठ, नंदू गंगावणे, निलेश सोनवणे, अमोल साबणे, भास्कर सरोदे, सागर इंगळे, संकेत, शेलार, प्रमोद शिंदे, अमोल साबणे, गणेश राऊत, अक्षय सूर्यवंशी, विकास शिंदे, अतुल तारडे,मारुती शिंदे. करण कापसे. सागर त्रिभुवन, सतीश कुलकर्णी, बाबासाहेब भालेराव, बाप्पू लबडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.