लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागात मंदीची लाट तीव्र

सामान्यांसोबतच व्यापारी मानसिक चिंतेत : अर्थकारण बिघडल्याने अनेकांनी घेतला धसका
लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागात मंदीची लाट तीव्र
संग्रहित

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) - शहरासह तालुक्यात सर्वच क्षेत्रात लॉकडाऊन आणि अन्य अडचणींमुळे मंदीची लाट अधिक तीव्र झाली आहे. जमीन, भूखंड घरांच्या किंमती खाली आल्या असून दुसरीकडे गरजू ग्राहक बाजारातील दलालांमुळे वेठीस धरला जात आहे. यामुळे लॉकडाऊन तातडीने न हटल्यास सर्वसामान्य, गोरगरीबांसह व्यापारी हे मानसिकदृष्ट्या खचणार आहे. सध्या पाथर्डीच्या बाजारपेठ मंदीचा विषयच ठरतोय चर्चेचा.

गेल्या दोन वर्षापासून बाजारपेठेचे अर्थचक्र बिघडले आहे. अवैध धंदे राजरोस सुरू मात्र व्यापार्‍यांवर चोरट्या सारखे जगण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन म्हणजे निव्वळ फार्स ठरून काळ्या बाजारात टाचणीपासून सोन्यांपर्यंत सर्व सहज उपलब्ध होत आहे.लॉकडाऊनला पुढे करून दलालांनी तर इंधनाचे भाव वाढल्याचे कारण दाखवत वाहतूकदारांनी प्रचंड दरवाढ केली. त्याचा परिणाम किरकोळ विक्रेता व ग्राहकांवर झाला आहे. कोणतीही आवश्यक वस्तू ज्यादा भावा शिवाय मिळत नाही. जाहीरपणे आर्थिक उलाढाल नसली तरी बँका व पतसंस्था मधील भरणा उलाढालीचा अंदाज येण्याला पुरेसा आहे. प्रशासणाची दंडुकेशाही व्यापार्‍यांवर मात्र अवैध धंदेवाले, काळाबाजारवाले राजरोस व्यवहार करतात.

परिस्थिती अनिश्‍चित आहे, याची भीती बाळगून वाटेल त्या भावात ग्राहक माल घेऊन बसला. गल्लोगल्ली फिरून हात जोडून विनवणी करत शेतकरी मातीमोल भावात विकत असून तर दुसर्‍या कोपर्‍यात मावा, गुटखा, दारू विक्री करणारा खुलेआम धंदा करतांना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे सामान्यांच्या हाती पैसा नाही. पगारदार वर्ग पैसा सांभाळत असून बाजारपेठेत वर्दळ कमी झाली आहे. गेल्या 15 दिवसात ग्राहकांची गर्दी कमी अन रस्त्यावर फिरणार्‍या, घरात बसून करमत नाही म्हणून घराबाहेर पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊनमागे घेतल्यास दोन दिवसानंतर बाजारपेठेत अगदी शुकशुकाट होईल, एवढी नाजूक स्थिती बनली आहे. बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले. परप्रांतीय मजूर निघून गेले. त्यामुळे बांधकामे जवळजवळ बंद आहेत.

जमिनीच्या व भूखंडाच्या व्यवहाराला ग्राहक नाही. मागील वर्षी सर्वसाधारणपणे जो बाजार भाव होता, त्यामध्ये सुमारे 25 टक्के किंमतीची घसरण होऊन खरेदी-विक्रीचे शासकीय व्यवहार ठप्प असल्याने जवळजवळ व्यवहार बंद आहेत. शहरात अनेक घरे बांधून तयार असून ग्राहक नाही. शहरात करोनाचे रुग्ण अगदी बोटावर मोजण्या इतपत असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या तालुक्यातील स्थिती भीतीदायक दर्शवित आहे.

तालुक्यात रोजगाराची साधने निर्माण करण्यात व उपलब्ध साधने टिकवून ठेवण्यात लोकप्रतिनिधींना स्वारस्य नाही. काम करणार्‍या हातांना काम नसल्याने तेच हात आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. बाजार पेठेतील मंदीच्या लाटेने ग्राहक, विक्रेते व व्यापार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन हटून परिस्थिती लवकर पूर्वपदावर यावी यासाठी शासन प्रशासन पातळीवर प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com