
टिळकनगर (वार्ताहर)
रसाळ, मधुर व तेवढीच औषधी असलेली जांभूळ हे हंगामी व बाजारात मोठी मागणी असलेले नगदी फळ पीक म्हणून ओळखले जाते. श्रीरामपूर, राहुरी, राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील जांभूळ लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
मात्र यावर्षी उन्हाच्या तीव्रतेचा फटका जांभूळ पिकाला बसला असून मोहोर गळून व करपून गेला आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात उशिरा आलेल्या मोहोरामुळे फळ उशिरा येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी जांभळे खायला मिळतील का अशी स्थिती झाडाच्या करपलेल्या मोहोराकडे बघून वाटत आहे. तसेच मे महिना संपत आला तरी बाजारात जांभळाची पाहिजे त्या प्रमाणात पुरेशी आवक झाली नसल्याने ग्राहक जांभळाच्या प्रतिक्षेत आहेत.
या कालावधीत जांभळे बाजारात येताच नागरिकांसह बाहेरील व्यापाऱ्यांची खरेदीसाठी झुंबड उडते. मात्र यंदा कडक उन्हाने जांभळाचे उत्पादन कमी होऊन हंगाम लांबला आहे. त्यामुळे जांभूळ पिकण्याचा कालावधी लांबून ते खराब होऊन शेतकऱ्यांना व बागायतदारांना नुकसान सहन करावे लागणार आहे. यंदा जांभूळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व ४० ते ५० टक्केच उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील शेतकरी बोलत आहे.
शेतकऱ्यांना जांभूळ पिकाच्या उत्पन्नातून येणाऱ्या खरीप हंगामाच्या पीक खर्चाची मोठी सोय होत होती. मात्र चालू वर्षी जांभळाचे पीक कमी किंवा काही ठिकाणी तर येणारच नाही, असे चित्र दिसत असल्याने शेतकऱ्यांसह जांभूळ व्यासायिक हवालदिल झाले असून त्यांचे वार्षिक गणित कोलमडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकऱ्यांच्या रानात जांभूळ झाडे असून, त्यापासून हजारोंचे उत्पन्न मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून औषध फवारणी केली आहे. मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेने झाडांच्या मोहराला फटका बसल्याने खर्चाएवढे उत्पन्न येते की नाही, अशी शंका अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.