गल्लोगल्ली करोना लसीकरणाची आयडीया

अ‍ॅड. धनंजय जाधव यांचा प्लॅन ; 25 गणेश मंडळांचा सहभाग
गल्लोगल्ली करोना लसीकरणाची आयडीया

अहमदनगर (प्रतिनिधी) - लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी गल्लोगल्ली लसीकरण करण्याचा प्रयोग नगरमध्ये राबविला जाणार आहे. तोफखाना भागातील माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेला हाक देत 25 गणेश मंडळांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे. या अगळ्यावेगळ्या लसीकरण केंद्रावरील गर्दीला लगाम बसेल असा आशावाद अ‍ॅड जाधव यांनी व्यक्त केला.

कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी धनंजय जाधव यांना ‘गल्लोगल्ली लसीकरण’ ही नवी कल्पना सुचली.

त्यासाठी गणेश मंडळांची मदत होऊ शकते, हे हेरून त्यांनी काल मंगळवारी रात्री गणेश मंडळांची बैठक बोलविली. या बैठकीला तोफखाना भागातील छोटे-मोठे 25 मंडळांचे पदाधिकारी जमा झाले. एका दिवशी एका गणेश मंडळास लस दिली जाईल. त्या मंडळाने त्यांच्या भागातील गल्लीत लसीकरण करून 45 वर्षापुढील नागरिकांना डोस द्यावा. महापालिका प्रशासनाच्य नियमांचे पालन करूनच लसीकरणाचा हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.

धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून लसीकरणाच्या नियोजनासाठी लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्यासाठी आयोजित बैठकीला तोफखाना भागातील 25 गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली. माजी उपमहापौर दीपक सूळ, सारंग पंधाडे, कैलास शिंदे, राजेंद्र विद्ये, राजेंद्र बोगा, गणेश झिंजे, चेतन आरकल, संतोष दोमल, महेश सब्बन, अभिजीत चीप्पा, निलेश गाडेकर, सुमित रच्चा, अमोल गवते, शिवदत्त पांढरे, गौरव परदेशी, राहुल गुंडू, कुणाल दुडगू, आशिष रंगा, प्रशांत घोसके, रवी वाघास्कर, हर्षल चिलका, विजय सामलेटी, निलेश गोंधळे, नदीम शेख, बन्सी बीद्रे, दीपक जाट, ललित बोरा, ऋषी गुंडला, अजय सासवडकर, प्रशांत मडके, नितीन कामुनी उपस्थित होते.

शहराच्या विविध भागातील नागरिक तोफखाना केंद्रावर येतात. त्यामुळे मुळ तोफखान्यातील नागरिक लसीपासून वंचित आहे. दाटीवाटीने वसलेल्या भागात संसर्ग होणे परवडणारे नाही. आरोग्य विभागाकडून जास्तीचे डोस घेऊन टप्प्याटप्याने 45 वर्षावरील सर्वांना लस दिली जाईल. तसे नियोजन केले आहे.

- अ‍ॅड. धनंजय जाधव, माजी नगरसेवक

सर्वांना मिळेल लस....

कोेरोनाने कोणाचे नातेवाईक तर कोणाचे जिवाभावाचे मित्र हिरावून घेतले. लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावरील गर्दीमुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी गल्लोगल्ली लसीकरणाची योजना आहे. गणेश मंडळामार्फत प्रत्येकाला लस मिळेल असे नियोजन केले जाणार आहे. केंद्रावर येण्याची गरज नसल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. या योजनेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल असे अ‍ॅड.धनंजय जाधव यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com