पावसामुळे रामपूर येथे राहते घर कोसळले

एक महिला जखमी ; सुदैवाने जीवितहानी टळली
पावसामुळे रामपूर येथे राहते घर कोसळले

नाऊर (वार्ताहर) -

श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर येथील एक कुटुंब गाढ झोपेत असताना रात्री 2 च्या सुमारास अवकाळी पावसामुळे अचानक

घराच्या चारही भिंती कोसळून पत्र्याचे उभे घर कोसळले. सुदैवाने घराशेजारी असलेला विद्युत प्रवाह घर पडल्या नंतर लगेच बंद झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र महिलेच्या पायावर भिंत पडल्याने त्या जखमी झाल्या असून घरातील टी.व्ही. संच, संसारपयोगी गॅस शेगडी, भांडी, पलंग, मांडणी आदी पूर्णतः मोडून गेले. कपडे, अन्न-धान्य भिजून खराब झाल्यामुळे मोठी वित्तहानी झाली.

रामपूर ग्रामपंचायत मिळकत 129 मधील संताराम खेमनर यांच्या राहत्या घरामध्ये राहत असलेले त्यांचे नातेवाईक हरिभाऊ काशिनाथ हांडगर त्यांची पत्नी सौ. ताई हांडगर व त्यांची दहा ते 12 वर्ष वयाच्या 2 मुली व तीन वर्षाचा 1 मुलगा असे कुंटूब गाढ झोपेत असताना रात्री 2 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात सौ. ताई हांडगर यांच्या पायावर भिंत पडल्याने त्या जखमी झाल्या.

रात्री या कुंटूबांचा मोठा आक्रोश ऐकल्यानंतर शेजारीच राहत असलेले रामदास लष्करे, श्रीरंग उपळकर, नवनाथ भडांगे, बाबा कोळेकर, जालिंदर धनवटे, राजू गुंजाळ, गणेश भडांगे आदीनी या कुटुंबियाला पत्र्या खालून बाहेर काढून दवाखान्यात पोहच केले.

या घटनेमध्ये या गरीब मजुरी करणार्‍या कुंटूबांची मोठी हानी झाली असुन घटनेचा पंचनामा कामगार तलाठी ए. जे. तेलतुंबडे, मदतनीस चंद्रकांत गहिरे यांनी केला.

याप्रसंगी सरपंच सुरेश भडांगे उपसरपंच पंढरीनाथ धनवटे हे उपस्थित होते.

वेळ आला होती पण काळ आला नव्हता

सुमारे 9.30 वाजता सुरु झालेला मुसळधार पाऊस रात्री 12 वाजेपर्यंत पडत होता. त्यानंतर हे कुंटूब गाढ झोपेत असतांना घराच्या चारही भिंती कोसळल्या. घरावरील पत्रा दैव बलवत्तर म्हणून आम्ही झोपलेल्या ठिकाणी न कोसळता पुढे सरकल्यामुळे आम्ही पती-पत्नी सह तीनही बालके वाचली. मलंग शहावली बाबांची कृपेमुळेच आम्ही वाचलो असल्याची भावना हरिभाऊ हांडगर यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com