सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार

बांधकाम साहित्याच्या दरात सरासरी ३३ टक्क्यांपर्यंत वाढ

घारगाव (वार्ताहर)

वाळू, स्टील, सिमेंट, विटा आणि इतर बांधकाम साहित्याच्या दरात तब्बल १७ ते ६० % वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडणार आहेत. परिणामी घर बांधणीसह नवीन घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याने त्यांचे घराचे स्वप्नही महागणार आहे.

काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच डाळी, तेल, किराणा मालाचेही दर गगनाला भिडले आहेत. या महागाईने सर्वसामान्य पिचला जात असतानाच बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाल्याने घर बांधणीच्या खर्चात आपोआपच वाढ होणार आहे. सहाजिकच हक्काचा निवरा मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्यांना काहीसा हात आखडता घ्यावा लागणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रा तील उलाढालीवरही परिणामाची शक्यता आहे.

वर्षभरापूर्वी ३८ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे स्टील आता ६१ रुपयांवर पोहोचले आहे. सिमेंट बॅगमागे वर्षभरात ११० रुपयांची वाढ झाली आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम वाळूच्या दरात प्रति ब्रास ६०० रुपये, वीट पाच रुपयाने, इलेक्ट्रिक पॉईंट १०० रुपये, फरशी प्रति स्क्वेअर फूट ८ रुपयाने, ग्रिल प्रतिकिलो २५ रुपये वाढले आहे. तर खिडक्यांच्या मजुरीत प्रति स्क्वेअर फूट ४० रुपये, दरवाजामध्ये ३० रुपये वाढ झाली आहे. आरसीसी बांधकाम करणाऱ्या मजुरांनी प्रति स्क्वेअर फुटात २० रुपयांची, वीट बांधकाम आणि प्लास्टर करणाऱ्या मजुरांनी ३० रुपयांची तर फरशी काम करणाऱ्या मजुरांनी २० रुपयांची वाढ केली आहे. एकूणच बांधकाम साहित्य खरेदी आणि मजुरीत ९ ते ६० टक्क्यांपर्यंत अशी सरासरी ३३ टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे घरांच्या किमती तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com