उत्पादन शुक्लचे अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल चालकाला लुटले

उत्पादन शुक्लचे अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल चालकाला लुटले

आश्‍वी (वार्ताहर) - संगमनेर तालुक्यातील शिबलापूर - संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेडगाव शिवारातील हॉटेल न्यु कॉर्नर च्या मालकाला आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे भासवत हॉटेलची तपासणी करण्याच्या बहाण्याने तीन तोतया अधिकार्‍यांनी 25 हजार रुपये लुटुन पलायन केले. यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन तोतया अधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सुनिल माधव फड यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मी व माझा भाऊ अनिल हे आमच्या हॉटेल समोरील अंगणात बसलो होतो. त्यावेळी तेथे महिद्रां एसयुव्हि (एम. एच. 15 जी. आर. 6887) ही गाडी आली. त्या गाडीतून आलेल्या तिघानी आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे सांगूून तुमचे हॉटेल उघडा आम्हाला रेकॉर्ड चेक करायचे आहेत असे म्हणाले.

त्यानंतर घरुन चावी आणून हॉटेल उघडल्यानंतर तू हॉटेल का उघडलेस असे लाल शर्ट घातलेला व्यक्ती मला म्हणाला. हॉटेल बंद असून तुम्ही उघडा म्हटल्याने मी उघडले असे म्हटल्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणाला की लॉकडाऊन मध्ये हॉटेल चालू असल्याने तुझ्यावर केस करुन तुझे परमिट रद्द करतो. त्यामुळे मी असे करु नका म्हणताच लाल शर्ट घातलेला व्यक्ती मला बाजूला घेऊन म्हणाला की आम्ही कारवाई करणार नाही गाडीत बसलेल्या साहेबांना मी सांगतो असे म्हणत 25 हजार रुपयाची मागणी केली.

मी घाबरलेलो असल्याने घरातून 25 हजार रुपये आणून लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या हातात दिले. यावेळी त्याच्याबरोबर दोन व गाडीत दोन व्यक्ती बसलेले होते. माझ्याकडून पैसे घेऊन ते घाईघाईने जात असल्यामुळे मला त्याचा संशय आला व मी त्यांना थांबण्यास सांगितले परंतू, ते माझा आवाज न ऐकताच गाडीत बसून निघुन गेले. त्यामुळे मी व माझा भाऊ अनिल यांनी दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना आश्‍वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते आमच्या दुचाकीला कट मारुन भरधाव वेगाने निघुन गेले असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नबंर 93/2021 नुसार भादवी कलम 170, 384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत. तर अवघ्या काही तासात भिमराव वाघमारे व रामेश्‍वर शिंदे (दोघे रा. सिन्नर, जि. नाशिक) या दोन तोतया अधिकार्‍याच्या मुसक्या सहा. पोलीस निरीक्षक नयन पाटील, हवालदार काळे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, होमगार्ड गुळवे यांनी आवळल्या. इतर आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com