
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी येथील डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला असल्याची माहिती औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधिज्ञ डी. आर. मरकड यांनी दिली.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्ह्यातून डॉ. विजय मकासरे यांचे नाव वगळण्यासाठी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी लाचेची मागणी केल्यामुळे डॉ. विजय मकासरे यांनी सदर पोलिसांविरुध्द लाच-लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरुन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट संगनमताने रिचर्ड गायकवाड याला फिर्याद द्यायला सांगून डॉ. विजय मकासरे यांचे विरोधात सरकारी कामात अडथळा (कलम 353,332,368, 283, 188) इत्यादी कलमान्वये, दि. 10/07/2019 रोजी गुन्हा दाखल करून चुकीच्या पध्दतीने तपास करून घाईघाईने दोषारोप पत्र दाखल केले होते.
या विरोधात डॉ. विजय मकासरे यांनी अॅड. दत्तात्रय मरकड यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दोषारोप पत्र रद्द होणेकामी याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने डॉ. विजय मकासरे यांच्या गाडीमध्ये असलेली सी. सी. टिव्ही फुटेज व लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईची कागदपत्रे पाहून तत्कालीन पो. नि. श्रीहरी बहिरट यांनी सदरच्या गुन्ह्याचा चुकीचा पध्दतीने तपास करून केवळ त्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाची केस दाखल होऊ नये म्हणून डॉ. विजय मकासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे मत नोंदवून डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्दचा गुन्हा रद्द केला.
त्यामुळे डॉ. विजय मकासरे हे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व इतर कर्मचारी यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करणार असून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अॅड. मरकड यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.