डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शिर्डीकरांचे आरोग्य धोक्यात!

डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शिर्डीकरांचे आरोग्य धोक्यात!

शिर्डी | प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसांपासून शिर्डीसह परिसरात पाऊस सुरू आहे. शिर्डीतील सखल भागात अद्यापही पाणी असून नागरिक हैराण झाले आहे. त्यातच या साचलेल्या पाण्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून डबके तयार झाले असून डासांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील गटार, नाले यातील पाणी वाहून न जाता जैसे थे स्थितीत आहे. तसेच पडीक जागा, तळघरे अशा ठिकाणी साठून राहणारे पाणी, चालू बांधकाम, पडीक जमिनी, रस्ता खुदाईच्या किंवा सुशोभीकरण सारख्या कामांमध्ये खोदलेल्या खड्डय़ांमध्ये पाणी साठून आहे. साचलेल्या पाण्यातच डास अंडी घालत असल्याने या गटारांमधील पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सकाळी, सायंकाळी व रात्रीच्या वेळेत डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. डासांच्या या वाढत्या संख्येमुळे ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्वच्छतेचे लाखोंचे पुरस्कार मिळविणारी शिर्डी नगरपरिषद मात्र या प्रश्नाकडे जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी उघड्या गटारींवर औषध फवारणीची मागणी करुनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे या तुबलल्या गटारीच्या पाण्यावर औषध फवारणी करुन डासमुक्त शिर्डी करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

नागरिकांना आर्थिक भुर्दंड तर 'बॅट’ विक्रेत्यांची चांदी

डासांच्या चाव्याने त्रस्त असलेल्या नागरिकांची झोप उडाली असून डासांना पळवून लावण्यासाठी डास प्रतिबंधक अगरबत्ती, लिक्विड यासह धुराचा वापर करत आहेत. मात्र या गोष्टीनाही डास दाद देत नाहीत. त्यामुळे डासांना मारण्यासाठी इलेक्ट्रिकची बॅट वापरली जाते. त्यामुळे अशा बॅटच्या विक्रीत वाढ झाली असून दरदिवशी पाच ते सहा बॅटची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे विक्रेत्यांची चांदी होत आहे पण नागरिकांना आर्थिक भुर्दंडही पडत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com