शिर्डी (प्रतिनिधी) -

शिर्डी शहरामध्ये नावाजलेल्या एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापकाने संकुलातील एका शिक्षिकेचा

विनयभंग केला. या विनयभंगाची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली असतानाच हा गुन्हा मागे घ्यावा त्यासाठी या प्राचार्यांनी आणखी मोठा कळस करत या तक्रार करणार्या शिक्षिकेला रस्त्यात अडवून दमदाटी करत हा गुन्हा मागे घे! मला जामीन झाला पाहिजे! यासाठी धमकी देत प्रयत्न केले. त्यामुळे याप्रकरणी आणखीनच नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

शिर्डी येथील एका शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक गंगाधर विश्वनाथ वरगुडे याने आपल्याच विद्यालयातील शिक्षिकेचा विनयभंग केल्याची तक्रार या पिडीत शिक्षिकेनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाच या मुख्याध्यापकाने त्यावरही कळस करत परत 18 फेब्रुवारी रोजी संबंधित पिडीत शिक्षिका आपल्या घरी कामावरून जात असताना तिला रस्त्यात थांबवून माझ्या विरोधात गुन्हा दाखल का केला? मला जामीन मिळवून दे! नाहीतर तुला मी अॅसिड टाकून मारून टाकीन, तुझ्या घरच्यांनाही मी संपवून टाकीन, अशी धमकी या पीडित शिक्षिकेला दिली असून या पीडित शिक्षिकेने त्यासंदर्भात शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

शिर्डी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून गंगाधर विश्वनाथ वरगुडे याच्याविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टेशन नंबर 83/2021 भादंवि कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडित शिक्षकेमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून आपल्याला विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर या मुख्याध्यापकांकडून विविध प्रकारे धमकी देण्यात येत आहे, उद्या आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले तर हा मुख्याध्यापक जबाबदार राहणार आहे, असे म्हटले आहे. मला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव रूपवते हे करत आहेत. पहिला गुन्हा केलाच मात्र त्यानंतर हा गुन्हा मिटवण्यासाठी दुसरा गुन्हा करणार्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आता या पीडित शिक्षिकेने व तिच्या कुटुंबाने केली आहे.