दारु दुकानावर कारवाईसाठी ग्रामपंचायत सरसावली

दारु दुकानावर कारवाईसाठी ग्रामपंचायत सरसावली

संगमनेर (शहर प्रतिनिधी)-

तालुक्यातील कासारा दुमाला येथील बेकायदेशीर दारू दुकानावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत सरसावली आहे. सदर बेकायदेशीर दुकान बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करू अशा आशयाची नोटीस तयार झाली असून ती संबंधितांना लवकरच बजावण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. दरम्यान या देशी दारू दुकानाला बेकायदेशीररित्या परवानगी देणार्‍या उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांचे मात्र या दुकानाकडे अद्यापही दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहरालगतच्या कासारा दुमाला येथे गेल्या दोन वर्षापासून हे देशी दारूचे दुकान सुरू आहे. दुकानाची मूळ जागा बदलून हे दुकान इतर जागेत हलविण्यात आले आहे. यासाठी लागणारे कागदपत्र नसतानाही उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी या दुकानाला लायसन दिल्याने या ठिकाणी दुकान सुरू करण्यात आले आहेत. जागेचा सातबारा उतारा निघत नसतानाही या दुकानाला लायसन मिळाले कसे आणि दुकान मालकाने दुकान अन्य जागेत हलविण्यात पूर्वी सादर केलेले कागदपत्र हे खोटे असल्याचे समोर आले आहे. यामुळे हे दुकान वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. याबाबत सार्वमतने वृत्त प्रसिद्ध करून या दुकानाची पोलखोल केली आहे. या दुकानावर कोणती कारवाई केली? अशी विचारणा करण्यासाठी संबंधित विभागाच्या स्थानिक व जिल्हा कार्यालयातील अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही अधिकार्‍याने प्रतिसाद दिला नाही. हे अधिकारी नॉटरीचेबल झाल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळत आहेत.

दरम्यान देशी दारूचे दुकान मालकाने उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना सादर केलेले प्रतिज्ञापत्र उपलब्ध झालेले आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेला सर्व मजकूर खरा व बरोबर असून तो खोटा निघाल्यास भारतीय दंड विधान कलम 199 व 200 मधील तरतुदीनुसार होणार्‍या दंडास व शिक्षेस आपण पात्र राहू, असे या दुकान चालकाने प्रतिज्ञापत्रात लिहून दिलेले आहे. वास्तविक त्यांनी सादर केलेले कागदपत्र खोटे व चुकीचे असल्याने आता दारू उत्पादन शुल्क अधिकारी त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कासारा दुमाला येथील ग्रामपंचायतीने या दुकानासाठी कोणताही दाखला दिलेला नाही. दुकानाबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ग्रामपंचायतीकडून या दुकानाला लवकरच नोटीस दिली जाणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com