कृषी विभागाची चारचाकी पोलिसांनी पाडली बंद

दुरूस्ती वाचून गाडी बंद
कृषी विभागाची चारचाकी पोलिसांनी पाडली बंद

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

जवळपास गेले ६ महिन्या पासुन तालुका कृषी विभाग, श्रीगोंदा यांचे शासकीय वाहन बोलेरो MH-16 N-440 हे पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा यांच्याकडे करोनाच्या कामकाजा करिता म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे.

मात्र काही दिवसांपासून ही गाडी बंद पडली असून या गाडीची दुरुस्ती नेमकी करायची कुणी यात गाडी बंद आहे. कृषी विभागाची कामे गाडी नसल्याने वेळेवर होत नाहीत. आता पोलिसही गाडी दुरुस्त करत नाहीत आणि कृषी विभागाकडे वाहन दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गाडी बंद अवस्थेत पोलीस स्टेशन समोर लावली आहे. सदरील कालावधी गेले ६ महिन्याचा असुन शेती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा खरीप हंगामाचा होता. या कालावधीत ५८ बियाणे तक्रारी- चौकशी, खत विक्री केंद्र- तपासणी, युरिया तक्रारी, अतिवृष्टी मुळे झालेल्या नैसर्गिक आपत्ती, पिक विमा करिताचे पिक कापणी प्रयोग, ठिबक सिंचन संच तपासणी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड अमंलबजावणी, खरीप हंगामातील किड व रोग यांच्या पाहणी इत्यादी महत्त्वाची कामे असुन देखील तालुका कृषी अधिकारी यांचे वाहन अजुनही पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात आहे. वाहन नसल्याने या विविध कामाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात कृषी विभागास गेले ६ महिने प्रंचड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

करोनाच्या नावाखाली अधिग्रहित केलेले वाहन गेले ३ महिन्यापासुन धुळ खात पडले असून वाहनाचे टायर बदलण्यात आले आहे. आत मधील आसन व्यवस्था देखील तुटलेली आहे. गेले २- ३ महिने सातत्याने पावसात वाहन उभे असल्यामुळे इंजिन देखील गंजण्यास सुरवात झालेली आहे.

याबाबतीत तालुका कृषी अधिकारी श्री. म्हस्के यांनी सांगितले की, वाहन ताब्यात मिळावे या करिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दोन वेळा लेखी पत्र व्यवहार केला आहे, तर तहसीलदार, पोलीस अधीक्षक यांना देखील पत्र पाठवून वाहन परत मिळण्यासाठी विनंती केली आहे. तर पोलीस निरीक्षक जाधव यांनी पत्र स्वीकारणार नसल्याची भुमिका घेतली आहे. एकुणच प्रशासनाने या बाबतीत पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

संबधीत वाहन हे आवश्यकता नसताना देखील गेले २ महिने वापरा शिवाय पोलीस स्टेशनला तसेच भिजत पडुन आहे. मात्र कृषी विभागाला ते परत देण्याची तत्परता पोलीस प्रशासन दाखवु शकलेले नाही. श्री म्हस्के यांनी पुढे सांगितले कि, सदरील वाहन दुरुस्ती करता कोणतीही तरतूद कृषी विभागाकडे नाही, संबधित वाहनाची दुरावस्था पोलीस निरीक्षक कार्यालयाकडून झाली असल्याने, त्यांनीच सदरील वाहन दुरुस्त करुन सुस्थितीत परत करावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com