
अहमदनगर (प्रतिनिधी)
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता पहिली ते बारावीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षाही संपूर्ण अभ्यासक्रमानुसारच होणार असल्याचे परिपत्रकावरून आता स्पष्ट झाले आहे.
करोनाचा प्रादूर्भाव मार्च २०२० मध्ये सुरू झाल्यानंतर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. तर गेली दोन वर्षे प्रत्यक्ष शाळेत अध्ययन अध्यापन मर्यादित स्वरुपात होत होते. या परिस्थितीत विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी २०२०-२१ मध्ये अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२१-२२ मध्येही करोना परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीही तसाच ठेवण्यात आला होता. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वमध्ये शाळा नियमित स्वरुपात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पहिली ते बारावीसाठी पूर्ववत शंभर टक्के अभ्यासक्रम लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने सांगितले.