
अहमदनगर | Ahmednagar
मागच्या मागच्या काही दिवसांपासून थंडी वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जवळपास १९ जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानविभागाने वर्तवली आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
तर पुणे, नगर जिल्ह्यांतील काही भागात थंडीची दाट लाट येण्याची शक्यता आहे. याचबरोबरऔरंगाबाद, जालना, बीडसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात थंडीची लाट शक्य आहे. तसेच कोल्हापूर सातारा आणि मुंबईमध्ये पारा १० ते १५ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान थंडीचा पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकर्यांनी पीकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यक्षा उत्पादनात घट होवून शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावू लागू शकते.
थंडीची तीव्रता वाढल्याने पिकांना ईजा होण्याची शक्यता असते. थंडी पासून संरक्षण होण्याकरीता पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. त्यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. थंडीमध्ये पिकांना खाते देणे टाळावे. थंडीमध्ये पिकांना मुळांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे पिकाना खते दिल्यास ते उपयोगी पडत नाही. थंडीच्या कालावधीमध्ये अंतरमशागतीची कामे टाळावीत, त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
थंडीत फळांना सच्छिद्र प्लास्टीक बॅगने झाकुण घ्यावे. द्राक्ष बागेतील किमान तापमान १० से पेक्षा कमी झाल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचे संतुलन बिघडते आणि मण्यातील हिरवे रंगद्रव्य गुलाबी रंगात बदलू शकते, याला गुलाबी मणी (पिंक बेरी) म्हणतात. याकरीता कोणतेही रासायनिक उपाय अद्याप उपलब्ध नसल्याने घड पेपरने झाकल्यास तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच द्राक्ष बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. बोदावर आच्छादन केल्यास मुळांच्या कक्षेतील तापमान वाढण्यास मदत होते. किमान तापमान फारच कमी झाल्याच्या ठिकठिकाणी बागेत शेकोटी व धूर करावा, त्यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
थंडीत जास्त काळ दव बिंदू पिकाच्या पानावर राहिल्यास संवेदनशील पिकांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्याकरीता ५०० पीपीएम थायोयुरियाची (१००० लिटर पाण्यात ५०० ग्रॅम थायोयुरिया) फवारणी करावी.
तसेच रात्रीच्या वेळेस गुरांना गोठ्यात बांधावे आणि थंडीपासून बचाव करण्याकरीता गोठा कोरडा ठेवावा. थंडीपासून संरक्षण करण्याकरीता जनावरांच्या आहारात प्रथिने व खनिजयुक्त पदार्थाचा वापर वाढवावा. थंडीच्या काळात जनावरांच्या उर्जेची गरज भागविण्याकरीता जनावरांना खनिज मिश्रीत मीठ, गव्हाचे धान्य व गूळ इत्यादी आहारामधून द्यावे. सकाळच्या वेळी जनावरे चरावयास सोडू नये. तसेच कोंबड्यांच्या शेडमध्ये कृत्रिम प्रकाश देऊन उष्णता निर्माण करावी.