शिर्डीत भक्तांना ५ हजार किलो केशर आमरसाची पंगत

शिरूरच्या दीपक करगळांनी दान केले आंबे
शिर्डीत भक्तांना ५ हजार किलो केशर आमरसाची पंगत

शिर्डी | शहर प्रतिनिधी

शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्मिय देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. याठिकाणी देशविदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्त हजेरी लावून विविध प्रकारचे दान करत असतात.

मात्र पुणे जिल्ह्यातील एका भक्ताने चक्क पाच हजार किलो केशर आंबे श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या प्रसादालयात देणगी स्वरुपात दान केले असून या केशर आंब्याची चर्चा देशविदेशात पोहचली आहे.

दरम्यान आतापर्यंत पंढरपूरच्या विठुरायाला एका भक्तांकडून सात हजार किलो हापूस आंब्याचे दान दिल्याचे बघीतले होते. परंतु शिर्डी येथील साईबाबांना देखील मागील दोन वर्षापासून केशर आंब्याचे दान येऊ लागले आहे.

यंदा पुणे जिल्‍ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्‍त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्‍दतीने पिकविलेले ५ हजार किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या श्री साईप्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या साईभक्‍त दिपक करगळ यांची स्‍वताःची मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्‍या पिकविलेले व उच्‍च प्रतीचे आहे. गेल्‍या दोन ते तीन वर्षापासुन साईभक्‍त करगळ हे केशर आंबे संस्‍थानला देणगी स्‍वरुपात देत आहे.

यावर्षी सुमारे ०४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५ हजार किलो केशर आंबे देणगी स्‍वरुपात संस्‍थानच्‍या श्री साईप्रसादालयात दिलेले आहे. दोन दिवस या आंब्‍यांच्‍या रसाचे प्रसाद भोजन साईभक्‍तांना तसेच दोन्‍ही रुग्‍णालयातील रुग्‍णांना, अनाथाश्रम, वृध्‍दाश्रम आदी ठिकाणी देण्‍यात येणार असल्‍याचेही श्रीमती बानायत यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com