नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

रस्त्यावर गाडी आडवी लावुन चोरी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड करण्यात शनिशिंगणापूर पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल (दि ०२) संध्याकाळच्या सुमारास अहमदनगर ते औरंगाबाद महामार्गवर कांगोणी गावाच्या शिवारात सुडके येथे रविंद्र राजेद्र कदम (रा. चांदा) यांना दोन अनोळखी इसमांनी मारहाण करत लुटले होते. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे अधीकारी व कर्मचारी यांनी तात्काळ गुप्त बातमीदारांना संपर्क करुन सदर घटनेचा लागलीच छडा लावण्याच्या दृष्टीकोनातुन फिर्यादी यांचेसह घटनास्थळाची पाहणी केली.

या दरम्यान गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, सदर महामार्गावर दोन ते तीन ईसम संशयास्पद रित्या फिरत असल्याचे माहीती प्राप्त झाली. त्यानुसार बातमीची शहानिशा करून कांगोणी फाट्यापासुन जवळचे रस्त्याला लागुन ऊसाचे शेतामध्ये काही ईसम संशायास्पदरित्या थांबलेले दिसुन आल्याने त्यांना हाटकताच ते पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे अधीकारी कर्मचारी यांनी आरोपी नितीन मोहन राशिनकर व वैभव बाबासाहेब घोडके यांना पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. दरम्यान आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून चोरीचा मोबाईल व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींपैकी नितीन मोहन राशिनकर हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागिय पोलिस अधीकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल, सफो गडाख, पोहेकाँ माळवे, पोहेकॉ देवकर, पोना शिंदे, चालक पोना शेख पोकाँ राठोड, पाकाँ वाघे मपोकाँ गोरे असे पथकाने सदरची कारवाई केलेली आहे .तसेच सदर गुन्ह्यात आरोपी यांनी वापरलेले दुचाकी वाहन हे कुठे चोरी झाले असल्यास त्याबाबत शनिशिंगणापुर पोलिस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन सपोनि सचिन बागुल यांनी केले आहे.