कर्जुले हर्या येथील कोव्हिड सेंटर राज्यात आदर्श ठरेल

मंत्री राजेश टोपे : सुपा एमआयडीसी येथे ट्रामा सेंटर व प्रलंबित आरोग्य केंद्रांना मिळणार मंजुरी
कर्जुले हर्या येथील कोव्हिड सेंटर राज्यात आदर्श ठरेल

पारनेर । तालुका प्रतिनिधी । Parner

राज्यात अनेक कोव्हिड सेंटर आहेत; परंतु कर्जुले हर्या येथील सेंटरमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जीव ओतून काम केल्याने ही सेंटर राज्यात आदर्शवत ठरेल, सुपा एम. आय. डी. सी. येथे ट्रामा सेंटर व तालुक्यातील प्रलंबित आरोग्य केंद्रांना मंजुरी देणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस व व आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने कर्जुले हर्या येथील राजीव गांधी अभियांत्रिकी विद्यालयात शरद पवार यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या 1 हजार बेडचे कोव्हिड सेंटरचे उद्घाटन आरोग्य मंत्री टोपे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 18) करण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अशोक सावंत, सभापती प्रशांत गायकवाड, बाबासाहेब तरटे, बापूसाहेब शिर्के, सुदाम पवार, विजय औटी, दादा शिंदे, कारभारी पोटघन, अ‍ॅड. राहूल झावरे, किसन लोटके, सुवर्णा घाडगे, पुनम मुंगसे, मीराताई आहेर, उषाताई बोरुडे, डॉ. दीपक आहेर, किरण आहेर, विक्रम कळमकर उपस्थित होते. करोना काळात केलेल्या कामाबद्दल प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, राजेंद्र भोसले, डॉ. प्रकाश लाळगे यांचा सन्मान करण्यात आला.

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा शरद पवारांचा विचार आहे आणि हा विचार खर्‍या अर्थाने राबवला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सामाजिक जाणिवेतून त्यांनी 1 हजार बेडचे सेंटर उभे केले आहे हे सेंटर उभे करताना त्यांनी तंतोतंत काळजी घेतल्याचे सांगत ऑक्सीजन बरोबरच खेळण्याची, बसण्याची देखील व्यवस्था आ. लंके यांनी केले आहे. सेंटरचे वातावरण पाहून रुग्ण घाबरून जाणार नाही, अशी खात्री व्यक्त करतानाच पारनेरचा आमदार हा साधा माणूस असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र तालुक्यासाठी झटत आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा येथील ट्रामा सेंटर तसेच ढवळपुरी, चोंभुत, पळवे, गुणोरे, अस्तगाव येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना निकष तपासून मंजुरी देणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. या मतदारसंघातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी पारनेरचे नाव देशात चमकविले असल्याचा आवर्जून उल्लेख मंत्री टोपे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारची घोडदौड चालू असून 90 टक्के शेतकर्‍यांचे कर्ज माफ केल्याचे सांगत मंत्री टोपे म्हणाले, आरोग्याच्या प्रश्नांबरोबरच तालुक्यातील इतर विकास कामांसाठी आपण प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणार आहे.

करोणाच्या महाभयंकर आजाराने जनता घाबरलेल्या अवस्थेत आहे. या जनतेला आधार देण्यासाठी राज्यातील आदर्श कोव्हिड सेंटरची आज उभारणी करण्यात आल्याचेही सांगत येथील रुग्णांना सर्व प्रकारच्या सुख सुविधा देण्याविषयी संपूर्ण काळजी घेणार असल्याचेही आपण सांगितले. सुपा येथे ट्रामा सेंटर व कामगार रुग्णालय तसेच तालुक्यातील गावांमध्ये आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळावी, अशी मागणीही केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश सरडे, राहूल झावरे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com