कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)-

धारणगाव रस्त्याला 54 खोका शॉप बांधण्याचे टेंडर दोन वेळा काढण्यात आले मात्र ते कोणीही न भरल्यामुळे त्याठिकाणी

खोका शॉप होऊ शकले नाही. आता मात्र नगर पालिकेची बाजारताळातील जागेवर 80 खोका शॉप बांधणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे. पालिका कार्यालयात आयोंजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष वहाडणे यांनी ही माहिती दिली.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक जवळ आली आहे. आगामी नोव्हेम्बर महिन्यात हि निवडणूक होणार आहे. त्यामुळे विस्थापितांची अनेकांना काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधकांकडून सुरु झाला आहे.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना वहाडणे म्हणाले, शहरात धारणगाव रोड येथे 54 खोका शॉप प्रस्तावित असून नगरपरिषदेने ठराव घेऊन पूनम थिएटर, एस.जी विद्यालय, पश्चिमेकडील भिंतीलगत जलसंपदा विभागाच्या भिंतीलगत, येवला रोड शिव ऑटो नजीक, चर्च भिंतीजवळ, न्यायालयासमोर, बाजार तळ, बुब हॉस्पिटलच्या पश्चिमेस, धारणगाव रोड गौतम बँकेसमोर, टिळकनगर शॉपीजवळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आदी ठिकाणी हे खोका शॉप प्रस्तावित केले आहे. मात्र याला नगररचना विभागाने अडचण आणली आहे.

या जागा देणे बाबत अहवाल देताना उचित नसल्याचे प्रतिकूल शेरे मारले आहे. त्यामुळे खरी अडचण झाली आहे. धारणगाव रोड गौतम बँकेसमोर आपण निविदा काढल्या मात्र त्या विरोधात शहरातील नागरिक मंदार शंकरराव आढाव यांनी उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. तो दावा प्रलंबित आहे.

धारणगाव रोड लगतच्या खोका शॉपला त्या परिसरातील काही तरुणानी लेखी निवेदन देऊन हरकत घेतली आहे. मात्र तुळजाभवानी शॉपिंग सेंटर ठिकाणी 80 गाळे बांधु शकतो. नगरपरिषदेच्या लेख्याप्रमाणे एकूण 615 विस्थापित आहे. यातील प्रत्यक्षात अनेकांचे दुकाने सुरू आहे. मात्र ज्यांची आर्थिक कुवत नाही असे खरे गरजू विस्थापित दुकानदार केवळ 450 च्या आसपास आहे. ज्यांची सोय झाली आहे अथवा ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यानी आपली नावे काढून घेतली तर बरे होईल असे आवाहन वहाडणे यांनी केले आहे.

ज्यांनी बाजार पेठेत स्वभांडवल गुंतवले आहे त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रारंभी घ्यावी लागेल असे आवाहन त्यांनी केले आहे. नवीन खोका शॉप करताना रोज शहरात साठ ते सत्तर हजार नागरिकांचे दळणवळण सुरु असते याचे भान ठेवले पाहिजे. या खेरीज आपण जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ज्या ठिकाणी गाळे वा खोका शॉप उभारण्यास विरोध केला त्या ठिकाणी हे काम करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याची कुठलीही हमी देता येणार नाही असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.