‘करोना औषध विक्रीवर दहा टक्केच नफा’ आदेशाचा फेरविचार व्हावा

‘करोना औषध विक्रीवर दहा टक्केच नफा’ आदेशाचा फेरविचार व्हावा

पाथर्डीच्या औषध विक्रेत्यांची मागणी : तालुका प्रशासनाला निवेदन

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) - औषध विक्रेत्यांचे वाढते व्यवसायिक खर्च, वाहतुकीचे वाढलेले दर व भांडवली गुंतवणूक विचारात घेता करोनासबंधीत औषध विक्रीवर दहा टक्केच नफा आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी पाथर्डी तालुका औषध विक्रेते संघटनेतर्फे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषध विक्रेत्यांनी करोना संशयित रुग्णांना परस्पर औषधे देऊ नयेत.

एमआरपीवर औषध न विकता खरेदी मूल्य अधिक, जीएसटी अधिक, दहा टक्के नफा या पद्धतीने बिले आकारावीत.करोना बाधीत रुग्णांची यादी स्थानिक यंत्रणेकडे विशिष्ट नमुन्यांत पाठविण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. या आदेशामुळे विविध तांत्रिक अडचणी कशा सोडवायच्या याबाबत संघटनेच्यावतीने स्थानिक यंत्रणेकडे मार्गदर्शन मागितले. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, लेखाधिकारी अशोक पंडित, तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुहास जरांगे, नगरसेवक अनिल बोरुडे, श्रीकांत जाजू, प्रकाश पालवे, संतोष जिरेसाळ, विश्‍वजीत गुगळे, गणेश बाहेती, ज्ञानेश्‍वर उदागे, अरुण आंधळे, वैभव गर्जे, भगवान आंधळे, प्रवीण फुंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. दराडे म्हणाले, औषध विक्रेत्यांचे मोठे योगदान करोना साथ रोगांच्या पार्श्‍वभूमीवर लाभत आहे. दुकानांची सरसकट तपासणी करण्यात येणार नसून कोविड केंद्राशी संलग्न असलेल्या दुकानांची तपासणी अग्रक्रमाने करण्याचे शासन आदेश आहेत. औषध विक्रेत्यांनी रुग्णांच्या सल्लागाराची भूमिका बजवावी. बाळंतपण व अपघाताचे रूग्ण वगळता सर्व रुग्णाकडे करोना संशयिताच्या नजरेने बघून त्यांना तपासणी करून घेण्याचा सल्ला विक्रेत्याने द्यावा. संशयित करोना बाधित रुग्णांमार्फत प्रसारक होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी औषध विक्रेत्यांचे सहकार्य मिळावे. यावेळी विविध विक्रेते म्हणाले, अशा स्वरूपाच्या आदेशात अनेक तांत्रिक अडचणी आहेत.

कोणती औषधे देऊ नयेत याची यादी नाही. औषध दिले तर गिर्‍हाईक सोडून कागदपत्रांची पूर्तता करणे गैरसोयीचे ठरणार आहे. मुळातच डॉक्टरांच्या बरोबरीने औषध विक्रेते काम करतात. सकाळी 8 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत व त्यानंतर कधीही फोन आला की पुन्हा दुकानात येऊन औषधे द्यावी लागतात. आमचे व कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दहा टक्के मार्जीनवर व्यवसाय कसा करावा. वाहतूक, नौकर खर्च, वीज बिले याचाही विचार व्हावा. गेली वर्षभर अहोरात्र सेवाकार्य करून थकलेल्या व्यवसायिकांना नियम व अटीचा जंजाळात अडकू नका, अशी विनंती करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी खिंडे यांनी विक्रेत्यांच्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांपुढे मांडून औषध सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यासोबत शासनाच्या आदेशाचे पालन करू, असे आश्‍वासन दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com