इनाम जमिनीतील कापड विक्रेत्याचे बांधकाम अडचणीत सापडणार

इनाम जमिनीतील कापड विक्रेत्याचे बांधकाम अडचणीत सापडणार

गुप्त वार्ता शाखेने अहवाल मुंबईला पाठविला

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

इनाम जमिनीची खरेदी विक्री करता येत नसतानाही शहरातील वादग्रस्त ठरलेल्या ताजणे मळा परिसरातील इनाम जमिनीची खरेदी-विक्री होऊन बांधकामे होताना दिसत आहे. एका होलसेल कापड विक्रेत्याने या जमिनीवर बांधकाम सुरू केल्याने विविध मुद्द्यांवरून हे बांधकाम अडचणीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

४ एकर १७ गुंठे ही इनामी जमीन गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही जागा पीर हजरत फखरुल्ला शाह उर्फ बारामासी या दर्गाहसाठी इनाम देण्यात आली होती. या जागेवर १९५४ सालापासून पीर दर्गाह अस्तित्वात आहे. या दर्गाहसाठी ही जागा इनाम म्हणून देण्यात आलेली आहे. इनामी जागा असतानाही एका परिवाराने कूळ दाखवून जमिनीची खरेदी विक्री केली आहे. शेख गफ्फार अब्दुल लतीफ हे दर्ग्याचे मुख्य विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.

दर्ग्याची जागा परत मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या जागेचा वाद सुरू असतानाही या वादग्रस्त जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले जात आहे. शहरातील एका बड्या कापड विक्रेत्याने या जागेवर बांधकाम सुरू या केले आहे. नगरपालिकेने कापड विक्रेत्याला बांधकाम परवानगी कशाच्या आधारावर दिली? असा सवाल दर्ग्याचे मुख्य विश्वस्त अब्दुल गफ्फार अब्दुल लतीफ शेख यांनी केला आहे. या जागेवर अनेक बांधकामे झाली आहेत. नगरपालिकेने या बांधकामाला पूर्णत्वाचा दाखलाही दिलेला नाही. वक्फ बोर्डाचा आदेश देऊनही या जागेवर बांधकामे सुरूच आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीरपणे या बांधकामांना परवानगी दिल्याने त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

शहरातील एका कुटुंबाने या जागेवर बोगस कूळ दाखवून या जागेची खरेदी विक्री केली आहे. ही जागा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी हा इसम या जागेतील व्यावसायिकांकडून पैसे मागत आहे. जागा खरेदी करताना पूर्ण रक्कम दिली आहे, आमच्याकडे पैसे मागू नका, असे सांगून या व्यक्तीला हुसकावून लावण्यात आले. एका विद्यमान नगरसेवकाच्या भावाने हस्तक्षेप करून या जागेमध्ये बांधकाम परवाने मिळवून दिल्याची चर्चा आहे.

गुप्त वार्ता शाखेने अहवाल मुंबईला पाठविला

या इनाम वर्ग २ जागेच्या खरेदी-विक्रीचा वाद मुंबईपर्यंत पोहोचला आहे. ही जागा दर्ग्याची असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या जागेच्या वादावरून संगमनेरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह खात्याने लक्ष घातले आहे. राज्य गुप्तवार्ता शाखेने याबाबतचा अहवाल मुंबई येथे पाठविला आहे. यामुळे या जागेची खरेदी-विक्री आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.