मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या शासकीय पुजेपासून रोखणार

विवेक कुलकर्णी : विश्‍व हिंदू परिषदेचा नगरमध्ये इशारा
मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या 
शासकीय पुजेपासून रोखणार

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - शासनाने वारकर्‍यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आहे. सरकारने वारकर्‍यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर सरकारने वारकर्‍यांच्या मागण्याचा विचार न केल्यास तसेच साधू संत व वारकरी यांच्यावरील अन्याय न थांबविल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.

सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासानाच्या बळाने वारकर्‍यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. राज्यातील ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक, त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भररस्त्यात वारकर्‍यांचे पारंपारिक गणवेश व भगवा ध्वज उतरवायला लावून, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणार्‍या मुख्यमंत्री यांनी तत्काळ माफी मागितली पाहिजे.

आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने, दर्शन या वरील प्रतिबंध दूर कराव, जसे कार्यालयात, बस प्रवासात, थिएटर किंवा हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीला मान्यता दिली आहे. तशी या अनुष्ठानांना अनुमती द्यावी. याप्रसंगी भागवत व रामायणाचार्य वासुदेव महाराज खेडकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. जय भोसले, मिलिंद मोभरकर, जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, सहमंत्री गौतम कराळे आदी उपस्तिथ होते.

रामायणाचार्य खेडकर महाराज म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. वारी हा वारकरी संप्रदाय व वारकर्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे .देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना. हॉटेल्स,मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणार्‍या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. परंतु शिस्तप्रिय, आज्ञाधारक वारकरी सम्प्रदायाची अडवणूक करण्याचे काम हे सरकार करीत आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना परवानगी द्यावी, संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता गावाबाहेर माळरानात मुक्काम करतील. मानाच्या पालखी सोबत किमान 50 वारकर्‍यांना परवानगी द्यावी. वारकर्‍यांना अटक करून सरकार वारीची परंपरा खंडित करीत आहेत, असे सांगितले. जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविक केले तर गौतम कराळे यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com