श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या काळ्या तीन कायद्याच्या निषेधासाठी कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचे शेतकरी

दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहेत. जगातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची नोंद झाली आहे. आंदोलक शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना जगभरातील अनेकजण विनंती करीत आहे. मात्र केंद्रातील सरकारने शेतकर्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आंदोलकांना पाण्याचा मार दिला असून केंद्र सरकार शेतकर्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

येथील प्रशासकीय इमारतीसमोर काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात महसूलमंत्री थोरात बोलत होते. याप्रसंगी आ. लहु कानडे, जिल्हा बँकेचे संचालक व उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुखे, उपाध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, इंद्रनाथ थोरात, सुभाष सांगळे, अंकुश कानडे, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, काँगेे्रस तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले, काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील शंभर दिवसांपापेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. दुसरीकडे इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल शंभर रुपये लिटर तर गॅस सिलिंडर 850 रुपयांवर झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत, दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी थेट अमेरिकेसह इंग्लड मधून पाठिंबा मिळाला. पंजाब- हरियाणाच्या शेतकर्यांनी देशभरात तांदूळ व गव्हाचा पुरवठा केला. परंतु केंद्रातील भाजपा सरकार केवळ भांडवलदार आणि नफेखोरांच्या फायद्याचे आहे. कृषी कायदे नफेखोरीसाठी साठेबाजी करण्यास वाव देणारे असून पंजाब राज्यात मोठी गोदामे बांधली आहे. करोनाचे संकट कायम असून पहिली लाट संपली म्हणून अनेकांनी नियमांचे पालन सोडले. परिणामी, मोठ्या प्रमाणात कोव्हिड रुग्ण वाढले. त्यामुळे करोनाबाबत काळजी घेऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन महसूलमंत्री थोरात यांनी केले.

यावेळी आ. लहू कानडे, केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकर्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल,डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत.या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे.देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आजचे हे आंदोलन काँग्रेसने केले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांगळे, काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे, युवा काँग्रेसचे महासचिव उपनगराध्यक्ष करण ससाणे, इंद्रनाथ थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, यांची भाषणे झाली.

प्रारंभी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांनी प्रास्तविक केले. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी सूत्रसंचालन केले. तर अॅड.समीन बागवान यांनी आभार मानले.