संगमनेरात बायोडिझेल विक्रीचा धंदा जोमात, लाखोंची उलाढाल

संगमनेरात बायोडिझेल विक्रीचा धंदा जोमात, लाखोंची उलाढाल

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

शहरात गेल्या काही दिवसांपासून बायोडिझेल विक्रीचा धंदा जोमात सुरू आहे. बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असताना शहर पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

संगमनेर शहरात हा व्यवसाय अचानक वाढला आहे. कमी किमतीत मिळणारे बायोडिझेल खरेदी करणारे मोठ्या संख्येने आहेत. मूळ डिझेल ९३ रुपये लिटर मिळते. तर बायोडिझेल ७५ रुपयांना उपलब्ध होते. त्यामुळे अनेक वाहनचालक आपल्या वाहनांमध्ये बायो डिझेलचा वापर करताना दिसत आहेत. नाशिक व सिन्नर येथून हे डिझेल संगमनेरात आणण्यात येते. शहरातील आठ ते दहा जण या व्यवसायात कार्यरत आहेत.

पावबाकी रोड व इतर ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे. शहर पोलिसांनी मागील महिन्यात कारवाई करून काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यातील आरोपी हे जामिनावर सुटलेले आहे. त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे.

बायोडिझेल स्वस्त मिळत असले तरी त्याचा वाहनावर विपरीत परिणाम होत आहे. या बायोडिझेलच्या वापरामुळे वाहनांचे काही भाग लवकर नादुरुस्त होत आहेत. असे असतानाही कमी किमतीत मिळते म्हणून या डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई होत असल्याने काहीजण हा व्यवसाय खुलेआम करताना दिसत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी पकडून राजरोसपणे हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com