
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सोमवारपासून (दिनांक 12 डिसेंबर) बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह (Youth Dead Body) नागापूर (Nagapur) परिसरातील काकासाहेब म्हस्के रोडवर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विजय भगवान कुर्हाडे (वय 22 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. नातेवाईकांकडून घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.
विजय भगवान कुर्हाडे हा युवक सोमवारपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) तक्रार दिली होती. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान विजय कुर्हाडे याचा मृतदेह काकासाहेब म्हस्के रोडवर (Kakasaheb Mhaske Road) आढळून आला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा (LCB), तोफखाना, एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान विजय कुर्हाडे याचा मृतदेह (Dead Body) आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा रूग्णालयात देखील गर्दी झाली होती. विजयच्या मृत्यू बाबत विविध चर्चा सुरू असून त्याचा घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर विजयच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे निरीक्षक आठरे यांनी सांगितले.