बालमटाकळी दुर्घटनेतील पितापुत्राचे मृतदेह सापडले

शोकाकूल वातावरणात एकाच चितेेवर अंत्यसंस्कार; गाव कडकडीत बंद
बालमटाकळी दुर्घटनेतील पितापुत्राचे मृतदेह सापडले

बोधेगाव|तालुका प्रतिनिधी|Bodhegaon

बालमटाकळी येथील घोरपडे कुटुंबातील तिघेजण गेवराई तालुक्यामध्ये पाहुण्याकडे जात असताना पावसामुळे नद्यांना पाणी आलेले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान कृष्णा घोरपडे हे मोटारसायकलवर जाताना अमृता नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटारसायकल घातली. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले त्यांची दोन्ही मुले वाहून गेले.

यातील वैष्णवी घोरपडे या मुलीचा मृतदेह शुक्रवारी (दि. 24) दुपारी सापडला तर अन्य पिता-पुत्राचा मृतदेहांचा दोन दिवस शोध सुरू होता. नदीच्या कडेने प्रशासनासह नातेवाईक शोध घेत असताना काल (शनिवारी) पाणी कमी झाल्याने बालमटाकळी येथील कृष्णा बाबासाहेब घोरपडे (वय 35) याचा मृतदेह सकाळी आढळून आला. त्यानंतर दुपारी मुलगा प्रथमेश घोरपडेचा मृतदेह काही अंतरावर सापडला. त्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. वातावरण हेलावून गेले होते.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चकलांबा येथे हलविण्यात आले होते. दुर्घटनेतील मृतदेह शोध मोहिमेसाठी चकलंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पीएसआय पवार, पीएसआय झिंझुर्डे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पितापुत्राचा शोध मोहीम हाती घेतली.

तसेच त्यांना सर्व पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासनासह पौळाचीवाडी, खळेगावचे स्थानिक ग्रामस्थ, घोरपडे यांचे नातेवाईक यांनी अथक परिश्रम घेतले. दोन दिवस कसून शोध घेतला जात होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास पिता-पुत्रावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागपंचमीच्या सणाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडल्याने शनिवारी (दि. 25) बालमटाकळीत शोककळा पसरली होती. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com