राहुरीत दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह आढळले; नातेवाईकांचा शोक अनावर

राहुरीत दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह आढळले; नातेवाईकांचा शोक अनावर

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुळा नदीपात्रातून (Mula River) वाहून गेलेल्या दोन्ही सख्ख्या भावांचे (Brother) मृतदेह काल सकाळी आढळून आले. काल दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी मोठा भाऊ अमर याचा मृतदेह गणपती घाट (Ganpati Ghat) परिसरात तर लहान भाऊ सुमित याचा मृतदेह मुळा देवनदी (Mula Dev River)संगमा जवळ पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. दोन्ही मुलांचा मृतदेह पाहून त्यांच्या आईने व नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला.

राहुरी (Rahuri) शहरहद्दीतील बारा ते पंधरा वयोगटातील पाच मुले शहरातील गणपती घाट परिसरात मुळा नदीपात्रात पोहण्यासाठी (Mula River Swimming) गेले होते. यावेळी पाच मुलांपैकी अमर व सुमित हे दोघे सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजे दरम्यान घडली होती.

घटनेची माहिती मिळताच मंगळवारी प्रशासनाने दिवसभर पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नव्हते. काल दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासात वाजे दरम्यान गणपती घाट परिसरात बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर मोठा भाऊ अमर चंद्रकांत पगारे हा पाण्यावर तरंगताना दिसून आला. यावेळी बाळासाहेब पवार, चंद्रकांत माळी, भागवत आहेर, गोविंद पवार, राजू नारद, विशाल राऊत या तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

अकरा वाजे दरम्यान लहान भाऊ सुमित चंद्रकांत पगारे याचा मृतदेह तनपुरेवाडी रोड, व्यंकटेश नर्सरी परिसरात गाडेकर यांच्या शेतजमीनलगत पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी देवा कर्डक, सुरेश वाघ, फुलसौंदर, आलम शेख तसेच स्थानिकांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली. दोन्ही मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणले होते.

Related Stories

No stories found.