श्रीगोंदा हत्याकांडातील आरोपींना अटक करावी
सार्वमत

श्रीगोंदा हत्याकांडातील आरोपींना अटक करावी

वंचित बहुजन आघाडी व विविध संघटनांची मागणी

Nilesh Jadhav

श्रीगोंदा | प्रतिनीधी | Shrigonda

तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी पारधी कुटुंबातील चार तरुणांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, आदिवासी पारधी समाज संघटना, मानव अधिकार अभियान, लोकअधिकार आंदोलन, संभाजी ब्रिगेड या पक्ष व संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी पारधी समाजातील एकाच कुटुंबातील नातीक कुंजीलाल चव्हाण (40), नागेश कुंजीलाल चव्हाण (16), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (35) आणि देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हबर्ऱ्या काळे (22) या चार तरुणांची गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली.

या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेऊन आरोपींना त्वरीत अटक करावी व त्यांच्यावर कडक कारवाई करावी. आणि आदिवासी पारधी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक डॉ. अरुण जाधव, आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसे‌वक अमित जाधव, मानव अधिकार अभियानाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद काळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, तसेच लोकाधिकार आंदोलनाचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले, समाजाचे कार्यकर्ते विजय काळे, चंद्रकांत काळे, पिराजी चव्हाण, स्वप्निल पवार, मोहन काळे, काका काळे, अजित भोसले, सुखलाल काळे आदींनी केले आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, समाज कल्याण मंत्री, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पोलीस आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा व तहसीलदार श्रीगोंदा यांना पाठविण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com