Mira Road Murder Case : प्रियकराकडून निर्घृण हत्या झालेली सरस्वती मुळची नगरची

अनाथश्रमात गेला बालपणीचा काळ;
Mira Road Murder Case : प्रियकराकडून निर्घृण हत्या झालेली सरस्वती मुळची नगरची

अहमदनगर (प्रतिनिधी)

संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणार्‍या मिरारोड येथील हत्याप्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची निर्घृणपणे हत्या केली. मनोजने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान सरस्वती वैद्य ही अनाथ असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी तपास केला असतान सरस्वती वैद्य हिचे नगर कनेक्शन समोर आले आहे. अनाथ असलेल्या सरस्वतीने आपला बालपणीचा काळ नगरच्या अनाथश्रमात घालवला होता.

सरस्वती वैद्य ही अनाथ मुलगी होती. तिचे दहावीपर्यंत शिक्षण नगरमधील एका अनाथ आश्रमात झाले. दहावी पास झाल्यानंतर ती नोकरीच्या शोधात मुंबईला गेली. तिला चार बहिणी होत्या, त्यापैकी एक छत्रपती संभाजीनगरला होती, बाकीच्या तिघींचा पत्ता नाही. मुंबईला मामा सापडले आहेत म्हणून ती आश्रमातून गेली होती. अधुनमधून ती आश्रमात आल्यावर खूप चांगली वागायची. तिला लग्न करायचे नव्हते.

दोन वर्षांपूर्वी ती पुन्हा संस्थेत आली होती तेव्हा तिने संस्थेतील लहान मुलींना तसेच शिक्षकांना नवे कपडे व खेळणी भेट म्हणून आणली होती. त्यावेळी तिची तब्येत अत्यंत खराब झालेली होती. संस्थेतील कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर तिला संस्थेतील संस्थाचालकांनी, कर्मचार्‍यांनी सरस्वती हिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने काहीही माहिती दिली नाही. आज अचानक तिच्या भयानक मृत्यूची घटना संस्थेला कळाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. सरस्वतीच्या मारेकर्‍याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आश्रमातील कर्मचार्‍यांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com