ठाकूर पिंपळगावमध्ये आई व चिमुकल्याचा मृतदेह आढळला
File Photo

ठाकूर पिंपळगावमध्ये आई व चिमुकल्याचा मृतदेह आढळला

आत्महत्या की हत्या तर्कवितर्कांना उधाण

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथील नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून येत पुलाच्या नळ्यांना दोन मृतदेह अडकल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिक व पोलिसांनी ते मृतदेह बाहेर काढले असून ते गावातील एक महिला व मुलाचे असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ही आत्महत्या की हत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलिसांनी मात्र आकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित मृत महिलेचा पती पसार झाला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा तपास लागणार आहे.

ज्योती अंबादास सोनवणे (वय 35) व दीपक अंबादास सोनवणे (वय 9) असे मृतांची नावे आहेत. ज्योती व दीपक सोनवणे हे आई, मुलगा, पती अंबादास सोनवणे व महिला असे चार जण घरामधून रविवार (दि. 8) दुपारी 1 वाजता बाहेर गेले होते. रात्री उशीरा अंबादास सोनवणे हे एकटेच घरी आले. त्याने मुलगी प्रियंका हिच्याकडे तुझी आई व मुलगा घरी आले नाही का असे विचारले. ती नाही म्हटल्यावर प्रियंका हिला घेऊन अंबादास सोनवणे हे बोधेगाव पोलीस चौकीमध्ये जाऊन ज्योती व दिपक सोनवणे हे रविवार दुपारपासून गायब झाले असल्याची माहिती दिली.

मुलीला घरी सोडून ते आईला व मुलाला पाहतो असे सांगून घरामधून निघून गेले. ते पुन्हा घरी आले नाहीत. गावातील नागरिक व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र माय लेकरं कुठेही सापडले नाहीत. रात्री परिसरात पाऊस झाल्याने सकाळी शेवगाव-गेवराई रस्त्यावरील ठाकूर पिंपळगाव नदीला पाणी आले. त्यामध्ये नागरिकांना दोन मृतदेह वाहत येऊन पुलाच्या नळ्यांमध्ये अडकलेले आढळून आले. याबाबत नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस व नागरिकांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असता त्यांना ते ज्योती व दीपक सोनवणे यांचे असल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची माहिती परिसरात पसरल्याने मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com