
कोपरगाव | तालुका प्रतिनिधी
मुंबई वांद्रे परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कथित बनावट प्रतिज्ञापत्रे सापडल्याच्या प्रकरणी कोपरगाव शहरात मुंबई गुन्हे शाखेचे पथक तीन दिवसापासून ठाण मांडून असून त्यांनी तीन दिवसात २०० प्रतिज्ञापत्रांची पडताळणी केली असून ती आज पूर्ण झाली आहे. त्यात बनावट असे काही सापडले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. तसेच शिवसेना पक्षाचं नाव देखील दोन्ही गटाना पोटनिवडणुकीत वापरता येणार नाही. यातच महाराष्ट्रातील ४५०० कथित बनावट शपथपत्र आढळल्या प्रकरणी गुन्हे शाखेची टीम कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघर सोबतच इतर ठिकाणी रवाना करण्यात आली होती.
या प्रकरणात बाबत मुंबई स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक कोपरगाव येथे देखील तीन दिवसांपासून ठाकरे गटाच्या २०० शपथ पत्रांची चौकशी करत होते. मात्र आज हा तपास पूर्ण झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली असून याबाबत संपूर्ण चौकशी अंती हे सर्व शपथ पत्रे शिवसैनिकांनीच स्वतः करून दिलेले असून यात कोणताही बनाव नसल्याचे आढळून आले असल्याची माहिती त्यांनी दिले आहे.
कोपरगाव येथून आम्ही ३ हजार शपथ पत्र दिलेले असून त्यातील २०० शपथ पत्रांचा तपास त्यांनी केला असतात त्यात काही आढळलेले नसून निव्वळ सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ED, CBI प्रमाणे गुन्हे शाखेच्या देखील वापर करून शिवसैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. शिंदे यांच्या मागे सत्ता, पैसे यासाठी हे आमदार असून उद्या सत्ता नसल्यावर यांच्या बरोबर कोणीही राहणार नाही.
- राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)