
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मंगलगेट येथील गुगल प्लस होलसेल कपड्याचे गोडावून कामगारानेच फोडून 90 हजार रूपयांची रक्कम व सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन असा एक लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख फैजान मुक्तार (वय 26 रा. नेवासा खुर्द ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. रफीउद्दीन रफीउल्ला सिध्दीकी (हल्ली रा. मुकुंदनगर, मुळ रा. उत्तरप्रदेश) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शेख हे गुगल प्लस होलसेल कपड्याचा व्यवसाय करतात. त्यांचे मंगलगेट येथे गोडावून आहे. त्यांनी ते गोडावून रविवार (दि. 15 जानेवारी) सायंकाळी सहा वाजता कुलूप लावून बंद केले होते.
ते दुसर्या दिवशी सोमवारी (दि. 16 जानेवारी) गोडावूनवर आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत पाहणी केली असता त्यांना सर्व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. गोडावूनच्या काउंटरमधील ड्राव्हरमध्ये ठेवलेली 90 हजार रूपयाची रक्कम, सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन तोडून नेलेले दिसले.
दरम्यान शेख यांनी त्यांच्या शेजारी असलेले प्रशांत मुळे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले असता त्यांना समजले की, त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार रफीउद्दीन रफीउल्ला सिध्दीकी याने गोडावूनचे शटरचे कुलूप तोडून पैसे व सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन चोरून नेले आहेत. शेख यांनी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.