संगमनेर |वार्ताहर| Sangmner

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी शासनाने पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावर्षी देण्यात आलेली पाठ्यपुस्तके पुढील शैक्षणिक वर्षात जमा करून घेण्यात येणार आहेत.

राज्यात दरवर्षी सुमारे दोनशे एक कोटी रुपयांची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कागद वापरण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची बाब लक्षात घेऊन पुस्तकांचा पूनर्वापर करण्यासंदर्भात शासन स्तरावर विचार करण्यात येत आहे.

विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमात पर्यावरण, निसर्ग, पाणी यासारखे विविध घटक शिकत असतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शिकलेल्या भागावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पर्यावरणाचा र्हास थांबवणे आवश्यक असल्याने पुस्तके जपून वापरणे आवश्यक असल्याने ती पुस्तके पुढील वर्षी जमा करण्यात येऊन त्याचा पुनर्वापर करण्यात यावा यादृष्टीने शासनाने परिपत्रक जारी केले आहे.

पुढील वर्षी अशा स्वरुपात किती प्रमाणात पुस्तके जमा झाली आहेत याचा अहवाल राज्य स्तरावर संकलित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने उचित कार्यवाही राज्याच्या शिक्षण संचालनालयाने करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

आर्थिक बचतही घडणार

राज्यात समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी वितरित करण्यात येतात. यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्यात येतो ही बाब लक्षात घेऊन पुस्तकांचा पुनर्वापर करण्यात शाळांनी सक्रियता दाखवल्यास राज्याचा आर्थिक बोजा कमी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके जपून वापरण्याचा संस्कार आणि पर्यावरणाचे जतन व शिकलेल्या बाबी प्रत्यक्ष कृतीत आणायच्या असतात हा विचार दृढ होण्यास मदत होईल.