राज्यात टीईटीपेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा

राज्यात टीईटीपेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा

नगर जिल्हा परिषदेतील भाजपचे गट नेते वाकचौरे यांचा आरोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरसह राज्यात टीईटी परीक्षेपेक्षा मोठा घोटाळा माध्यमिक शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेला आहे. या शिक्षकांच्या भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यात दोषी आढळणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नगर जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्ष प्रतोद जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

या शिक्षक भरती घोटाळ्यात टीईटी पास नसतांनाही हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत. शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्णची अट 2013 साली लागू झाली आणि तेव्हापासून शिक्षक भरती बंद झाली. यातून पळवाट काढत संस्था चालक आणि शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी संबंधीत शिक्षक हे 2012 पूर्वी आमच्या शाळेत काम करत असल्याचे रेकॉर्ड तयार केले. यासाठी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरून संबंधीत शिक्षकांच्या पदाला मान्यता घेतली. अशा प्रकारे राज्यात हजारो शिक्षक आज सेवेत रुजू आहेत. राज्यातील जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त शिक्षकांचा यात समावेश असल्याचा संशय सदस्य वाकचौरे यांनी केला आहे.

या घोटाळ्यात शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरी पुस्तक 2012 पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक 2012 पासून नोकरीत होते. त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते असे रेकॉर्ड तयार करायचे.त्याला शिक्षणाधिकारी मान्यता मिळवली. याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या व हे शिक्षक 9 वी व 10 वीला शिकवत होते असे दाखवून टीईटीतून सूट मिळवून घेतली. (टीईटीची अट आठवीपर्यंत आहे) भरती झाल्यानंतर या शिक्षकांकडून शालार्थ आयडी देण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले गेले आणि पगार सुरू करण्यासाठी पैसे घेतले जातात. त्यानंतर त्यांच्या पूर्वीपासून नोकरीत असल्याचे दाखवून लाखो रुपयांचा पगाराचा फरकही काढण्यात येतो. त्यातही अधिकार्‍यांनाही वाटा देण्यात येतो. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात गेल्या काही वर्षात झालेल्या माध्यमिक शिक्षकांच्या भरतीची चौकशी झाल्यास शिक्षण विभागातील मोठा घोटाळा उघड होण्याचा दावा वाकचौरे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com