टीईटी प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ द्यावी

शिक्षण मंत्र्यांना पत्र : शिक्षक परिषदेची मागणी
टीईटी प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ द्यावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील सात वर्षाच्या काळावधीत शिक्षक भरती न झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पत्र पाठविण्यात आले आहे. एनसीआरटीईने शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दि.15 डिसेंबर 2013 रोजी पहिली टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पेपर एक साठी 3 लाख 83 हजार 630 तर पेपर दोन साठी 2 लाख 35 हजार 769 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण 31 हजार 72 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण उमेदवारांना 2014 मध्ये उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्राची पात्रता सात वर्षासाठी असल्यामुळे मे 2021 मध्ये या प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात येत आहे.

शैक्षणिक सत्र 2012-13 पासून शिक्षक पदांच्या नियुक्तीला मोठ्या प्रमाणात बंदी टाकण्यात आल्यामुळे त्या प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी सदर उमेदवारांना योग्य ती संधी उपलब्ध झाली नाही. उमेदवारांना नियुक्तीची संधी न देता त्यांनी प्राप्त केले टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र मे 2021 मध्ये अवैध होत आहे. ही बाब उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांवर अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com