Omicron : परदेशातून जिल्ह्यात आलेल्या ‘त्या’ 16 जणांची तपासणी

सर्वजण क्वारंटाइन, दोघांचा शोध सुरू || नगर मनपा हद्दीतील पाच जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
Omicron : परदेशातून जिल्ह्यात आलेल्या ‘त्या’ 16 जणांची तपासणी

श्रीरामपूर, अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आलेल्या विविध तालुक्यांतील 27 पैकी 25 जणांपर्यंत पोहचण्यात प्रशासनाला यश आले आहे.

श्रीरामपूरात 29 नोव्हेंबर 2021 रोजी दुबईहून-मुंबई व मुंबईहून श्रीरामपूरातील वॉर्ड नं. 6 मधील एकाच कुटुंबातील चौघेजण आले असता त्यांचा शोध घेऊन तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून आतापर्यंतचे त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून अद्याप एक तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा तो शेवटचा अहवाल आल्यानंतर ते निगेटीव्ह का पॉझिटीव्ह याबाबत निर्णय कळणार आहे. तोपर्यंत या चौघांंनाही सुरक्षितता म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

एकाच कुटुंबातील या चौघांचा दुबईहून येतांना मुंबई व श्रीरामपूरात ज्यांच्याशी संपर्क आला त्यांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे याबाबत पूर्णपणे काळजी घेतली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.

संगमनेर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचाही शोध घेण्यात आला आहे. त्याची तपासणी केली असता चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील 6 जणांचीही तपासणी करण्यात आली असता तेही निगेटीव्ह आले असून सर्वजण होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली.

राहुरीत तिघे परदेशातून आले होते. त्यापैकी दोघांना जयपूरला जाऊन क्वारंटाइन करण्यात आले. तसेच या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली. एकजण तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात कारंटाईन आहे.

कोपरगाव प्रतिनिधीने कळविले की, कोपरगाव शहरात अमेरिकेतून दोघे आले आहेत. त्यांची आरटीपिसीआर चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने दोघांनाही होमक्वारंटाइन करण्यात आले. तर अंजनापूर येथील दोघे नेदरलँड येथून आलेले आहेत. मात्र ते कोपरगावला न येता नाशिक येथे गेलेले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

अकोले प्रतिनिधीने कळविले की, अकोलेतही नेदरलँड येथून चार व्यक्ती आल्या होत्या. त्यांची तपासणी करण्यातआली आहे. या व्यक्तींच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या असल्यातरी त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 3 डिसेंबरला 15 व्यक्ती बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले होते. यात कोपरगाव 2, राहाता आणि राहुरी प्रत्येकी 3, संगमनेर 1, श्रीरामपूरात 4 आणि नगर मनपा हद्दीतील दोघांचा समावेश होता. तर 5 डिसेंबरला अकोलेत 4, कोपरगाव 2, राहाता 1 आणि नगर मनपा हद्दीतील 5 जणांचा यात समावेश आहे. दोन दिवसात जिल्ह्यात 27 जण बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले आहेत. यातील 25 जण सापडले असून उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू आहे.

राहाता वार्ताहराने कळविले की, राहाता तालुक्यात परदेशातून आलेल्या 4 नागरिकांपैकी 2 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केली असून 2 व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

राहाता तालुक्यात परदेशातून आलेल्या चार नागरिकांपैकी 1 व्यक्ती नेदरलँड तर दुसरा अमेरिका व 2 व्यक्ती नेपाळ या ठिकाणाहून आले आहे. राहाता तालुक्यातील कुंदन हिरे यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना करून नेदरलँड व अमेरिका येथून आलेल्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली आहे. त्यातील अमेरिका इथून आला व्यक्ती राहाता तालुक्यात आला नसून तो पुणे येथे थांबला आहे. त्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर नेदरलँड या ठिकाणाहून आलेल्या व्यक्तीचा चाचणी रिपोर्ट येणे बाकी असून सदर व्यक्तीस घरीच विलगीकरण राहण्याच्या सूचना प्रशासनाने केलेल्या आहे. नेपाल येथून आलेल्या दोन व्यक्तींचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.

राहाता तालुक्यात शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी देशाबरोबरच परदेशातून अनेक भाविकींची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदारांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे . तालुक्यातील नागरिकांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे. परदेशातून शिर्डी येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची माहिती संस्थेने ठेवावी. तालुक्यात बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांची माहिती स्थानिक प्रशासनाला तात्काळ कळवावी. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com