नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, तीन युवक ठार

नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, तीन युवक ठार

कर्जत | प्रतिनिधी

नगर सोलापूर महामार्गावर मांदळी नजीक भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर एकाला नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मृतांमध्ये शरद शोभाचंद पिसाळ (32 वर्ष), निळकंठ रावसाहेब माने (34 वर्ष) व धर्मराज लिंबाजी सकट (27 वर्ष) (सर्व राहणार थेरगाव. तालुका-कर्जत) या तीन युवकांचा समावेश आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये स्विफ्ट कार व मालवाहतूक ट्रक यांचा समावेश आहे.

तालुक्यातील थेरगाव येथील चार तरुण घोगरगाव येथून चारचाकी वाहनाने गावाकडे येत असताना मांदळी नजीक हा भीषण अपघात झाला. मिरजगावच्या दिशेने जाणारी कार (एम एच ०४ डि एन ३३४१) अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकच्या (टी एन २८एएम ३३४२) पुढील चाकाच्या बाजूला व रस्ता दुभाजकावर जोरदार आदळली आहे. हा अपघात इतका भयानक होता की कार गाडीचे इंजिन बाजूला फेकले गेलेले आहे. अपघातानंतर तरुणही बाहेर फेकले गेले होते असे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे तात्काळ घटनास्थळी पोलिस पथक घेवून दाखल झाले. तसेच थेरगावचे सरपंच रविंद्र महारणवर, मांदळीचे उपसरपंच धनेश गांगर्डे, नागमठाणचे सरपंच देविदास महारणवर, शोभचंद शिंदे, उपसरपंच रामा शिंदे, सुधीर बचाटे, स्वप्नील शहाणे, परशुराम बावडकर, पोलीस पाटील ईश्वर जोगदंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.

मृतांना कर्जत येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाता नंतर नगर सोलापूर महामार्गावर अपघात झालेल्या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. ती पोलीस विभागाने दूर केली. अपघातानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते अशी माहिती सह्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com