शिक्षक पुरस्करांवरून झेडपी पदाधिकार्‍यांमध्ये ताणा-ताणी

अखेर यादी फायनल : विभागीय आयुक्तांच्या मान्यतेला जाणार
शिक्षक पुरस्करांवरून झेडपी पदाधिकार्‍यांमध्ये ताणा-ताणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत शुक्रवारी जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांमध्ये जिल्हा शिक्षक पुरस्करांची नावे फायनल करण्यावरून ताणा-ताणी झाली. अखेर दिवस मावळ्यानंतर फायनल झालेल्या पुरस्कारार्थीच्या फाईलवर सह्या घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना पदाधिकार्‍यांना शोधण्याची वेळ आली. दरम्यान, पुरस्कारार्थीचे नाव फायनल करतांना नाराज झालेल्या एका पदाधिकार्‍यांच्या नावाखाली समितीच्या उर्वरित सदस्यांनी आपले हित साधण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी 5 सप्टेंबरला प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे 14 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. पूर्वी या पुरस्कारार्थी शिक्षकाला राज्य सरकारच्यावतीने वेतन वाढ मिळत होती. त्यावेळी पुरस्कारासाठी मोठी स्पर्धा असायची. मात्र, वेतन वाढ बंद झाल्यानंतर या पुरस्कारासाठी शिक्षकांची गर्दी काही प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र, केवळ मानासाठी काहीजण पुरस्कारासाठी शर्तीचे प्रयत्न करतात. यातूूनच निवड समितीमध्ये ताणा-तानी होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्याचा अनुभव पुन्हा शुक्रवारी आला.

या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीची अखेर काल बैठक झाली. समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष असून उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती, माध्यमिक आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, महिला बालकल्याण व समाज कल्याण समिती सभापती आणि शिक्षक महाविद्यालयाचे प्रचार्य या समितीत आहेत. या समितीच्या बैठकीत अखेर 14 तालुक्यातून 14 आणि एक केंद्रप्रमुख यांचे नाव अंतिम झाले असून ही नावे अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे आज जाणार आहे. त्यानंतर पुस्काराची घोषणा आज दुपारी अथवा सायंकाळी होणार आहे.

यंदा परीक्षा टळली

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी दरवर्षी 25 गुणांची परीक्षा घेण्यात येत होती. यंदा ती परीक्षा टळली असून यामुळे पुरस्कारासाठी शिक्षकांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला. एकावर्षी 25 गुणांच्या या परीक्षेत 14 गुण मिळविणारा शिक्षक प्रथम आला होता. यावरून परीक्षेचे महत्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com