टेम्पो चालकाचा खुन करणार्‍यास जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल || शेवगाव तालुक्यातील घटना
टेम्पो चालकाचा खुन करणार्‍यास जन्मठेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगाव तालुक्यातील 2012 साली झालेल्या खुन प्रकरणातील आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश निरंजन आर. नाईकवाडे यांनी दोषी धरून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश भगवान मगर (वय 49 रा. गेवराई, जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने गणेश अभिमान जगताप (वय 22 रा. चर्हाटे फाटा, तळेगाव, ता. जि. बीड) यास शेकटे शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले होते.

चर्हाटे फाटा, तळेगाव येथे गणेश हा त्याच्या आई व पत्नीसोबत राहात होता व टेम्पो चालक म्हणून काम करीत होता. 9 ऑक्टोबर 2012 रोजी भाडे घेऊन जातो असे सांगून टेम्पो घेऊन गेला होता. त्या दिवशी तो घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह दुसर्‍या दिवशी 10 ऑक्टोबर 2012 रोजी पारगावच्या घाटात आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण केलेल्या जखमा होता. याप्रकरणी गणेशची आई संजीवनी यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेवगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.डी. माने यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तपासादरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी राजाभाऊ जानबा कणसे याने गणेश याला जीवे ठार मारण्यासाठी भगवान गोविंद मगर, प्रकाश भगवान मगर व भीमा श्रीमंत पिंगळे यांना दीड लाख रूपयाची सुपारी दिल्याचे समोर आले. आरोपींविरूध्द गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी प्रकाश भगवान मगर याने इतर आरोपी मयत भगवान गोविंद मगर, फरार आरोपी भीमा श्रीमंत पिंगळे व राजाभाऊ जानबा कणसे यांच्या मदतीने गणेश यास जीवे ठार मारण्याच्या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार दोषी धरून आरोपी प्रकाश मगर यास जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. फरार आरोपी भीमा श्रीमंत पिंगळे आणि राजाभाऊ जानबा कणसे यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंटचा आदेश केलेला आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार गोविंद केसकर यांनी कामकाज पाहिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com